सांगोला : कृषी उत्पन्न समिती व खरेदी-विक्री संघाने तालुक्यातील मका खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या ५०३पैकी २२६ शेतकऱ्यांचा ९९ लाख ९० हजार रूपये किमतीचा ५,४०० क्विंटल मका ३० जानेवारीअखेर खरेदी करत उद्दिष्टपूर्ती केली. शासनाने मका खरेदीचे दिलेले उद्दिष्ट एक दिवस आधीच पूर्ण केल्याचे कृषी उत्पन्न समिती व खरेदी-विक्री संघाने सांगितले.
महाराष्ट्र शासन, द महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बाजार समिती व खरेदी-विक्री संघ, सांगोला यांच्यातर्फे वखार महामंडळ, सांगोला येथे शासकीय भरडधान्य आधारभूत खरेदी योजनेंतर्गत ७ डिसेंबर रोजी मका खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. शासनाने मक्याची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल १,८५० रुपये इतकी ठेवली होती.
यंदा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामात ६,२२८ हेक्टर क्षेत्रावर मक्याचे पीक घेतल्याने उत्पादन वाढले आहे. पहिल्या टप्प्यात १,४१० क्विंटल तर दुसऱ्या टप्प्यात ३,९९० क्विंटल अशी ५,४०० क्विंटल मका खरेदी करण्यात आली. शेतकऱ्यांकडून मका खरेदी केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, खरेदी केलेला मका गोडावूनमध्ये साठवून ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दररोज २५० ते ३०० क्विंटल मका खरेदी करण्यात आला. मका विक्री करताना शेतकऱ्यांना २५ रुपये प्रतिक्विंटल हमाली द्यावी लागली. मका खरेदी केल्यानंतर १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे. मका खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न समिती व खरेदी-विक्री संघाचे सुरेश सुरवसे, दयानंद बनसोडे, राजेंद्र साळुंखे, सुशांत भोसले, श्याम माळी यांनी परिश्रम घेतले.