प्रचार शिगेला, उमेदवारांची धावपळ

By Admin | Updated: February 19, 2017 16:36 IST2017-02-19T16:36:11+5:302017-02-19T16:36:11+5:30

प्रचार शिगेला, उमेदवारांची धावपळ

The publicity of Shigela, the run of the candidates | प्रचार शिगेला, उमेदवारांची धावपळ

प्रचार शिगेला, उमेदवारांची धावपळ

प्रचार शिगेला, उमेदवारांची धावपळ
सोलापूर : महापालिका निवडणुकीचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचार संपण्याला आता अवघे काही तास शिल्लक असताना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धावपळ उडाली आहे.
महापालिका पंचवार्षिक निवडणुकीत २६ प्रभागांतील १०२ जागांसाठी ६२३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. छाननी, माघार आणि चिन्ह वाटपानंतर म्हणजे ९ फेबु्रवारीपासून निवडणूक प्रचाराला सुरूवात झाली. सर्वच उमेदवारांनी होम टु होम प्रचारावर भर दिला. त्याचबरोबर रिक्षावर ध्वनिक्षेपक बसवून वेगवेगळ्या गीतांच्या माध्यमातून मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. रस्त्यांवरील कॉर्नर सभांना पोलिसांनी परवानगी नाकारल्याने उमेदवारांची मोठी पंचाईत झाली. त्यामुळे नगरांतर्गतच्या मैदानावर सभा घेण्यात आल्या. उमेदवारांना सभांंना गर्दी खेचण्यास मोठी अडचण निर्माण झाली. सर्व पक्षांच्या सभांमध्ये हे चित्र दिसून आले. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात सर्वच उमेदवारांनी पदयात्रेवर भर दिला.
वाजत गाजत गल्लीबोळ, सोसायट्यांमध्ये उमेदवारांच्या पदयात्रा निघाल्यामुळे वातावरण ढवळून निघाले. पण दुपारनंतर उमेदवारांची चांगलीच कसरत झाली. उन्हाच्या कडाक्यामुळे बहुतांश उमेदवारांनी विश्रांती घेऊन प्रचार केला. प्रचारासाठी माणसे गोळा करताना प्रत्येक उमेदवाराला चांगलाच ‘भाव’द्यावा लागला.
सर्वच पक्षांच्या प्रमुखांकडून अगदी शेवटच्या टप्प्यातही उमेदवारांकडे पक्षनिधी पोहोच झाला नाही. उमेदवारांकडची रसद संपल्याने पक्षाकडून काही मिळते का, यासाठी प्रतिनिधी चकरा मारताना दिसत होते. भाजपकडून काही उमेदवारांना पक्षनिधी दिल्याची चर्चा होती, पण इतर पक्षांचे उमेदवार अस्वस्थ झाल्याचे दिसत होते. बऱ्याच जणांकडे रसद संपल्याने केंद्र प्रतिनिधींची व्यवस्था कशी करायची, याची चिंता भेडसावत होती. उमेदवारांची अशी धावपळ उडाली असली तरी मतदारांमध्ये निरुत्साहाचे वातावरण दिसले. आज शनिवार सुटीचा दिवस असल्याने कित्येकांनी दार लोटून आराम करणे पसंत केले. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी घराबाहेर थांबून प्रतीक्षा करीत होते. घराबाहेरच परिचयपत्र टाकून पुढचा रस्ता धरण्याची वेळ प्रचार कार्यकर्त्यांवर आल्याचे दिसून आले. नवीपेठ, बाळीवेस, जुळे सोलापूर परिसरात दुपारी शुकशुकाट दिसून आला.
------------------------------
आज प्रचाराचा समारोप
रविवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक प्रचारास मुभा आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांनी दुपारनंतर जाहीर सभांद्वारे प्रचाराचा समारोप करण्याचे नियोजन केले आहे. पाच वाजेनंतर प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्यानंतर कोणासही प्रचार करता येणार नाही. यावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाचे लक्ष राहणार आहे. इकडे निवडणूक कार्यालयात मतदान घेण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
----------------------------
प्रतिनिधी नियुक्तीसाठी गडबड
प्रचारासाठी आता काही तास उरले असल्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा आटापिटा दिसून आला. अशात मतदान केंद्रावर प्रतिनिधी नियुक्तीसाठी निवडणूक कार्यालयात उमेदवारांना यावे लागत होते. उमेदवारांच्या सहीशिवाय निवडणूक कार्यालय अधिकृत प्रतिनिधींना मान्यता देत नाही. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवार गडबडीने कार्यालयात येत होते. सहीचे काम संपले की ते धावतच मतदारसंघाकडे पळताना दिसले.

Web Title: The publicity of Shigela, the run of the candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.