सक्तीची वीजबाकी वसुली थांबवण्याची जनहितची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:23 IST2021-03-27T04:23:36+5:302021-03-27T04:23:36+5:30
सोलापूर : उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. वीज तोडल्यामुळे जनावरांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. याबरोबरच उभी पिके आणि बागा ...

सक्तीची वीजबाकी वसुली थांबवण्याची जनहितची मागणी
सोलापूर : उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. वीज तोडल्यामुळे जनावरांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. याबरोबरच उभी पिके आणि बागा जळत आहेत. तसेच या काळात कारखान्यांनी उसाचे बिलही जमा केलेले नाही. सध्या सक्तीने वीज थकबाकी वसुली सुरु असून ती थांबवून दोन महिन्याची मुदत वाढ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. मागील वर्षीची अतिवृष्टी, ऊस बिले थकीत असताना वीजथकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे.जिल्ह्यात गावोगावी वीज कनेक्शन तोडले आहेत. जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी दिवसभरात किमान दोन तास वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या शिष्टमंडळात विकास जाधव, नाना माेरे, चंद्रकांत निकम, रवींद्र मुठाळ, बलभीम माळी, रघू चव्हाण, बाळासाहेब नागणे, किशोर दत्तू सहभागी झाले होते.