पाण्यासाठी स्वतंत्र फिडर देणार
By Admin | Updated: July 8, 2014 00:53 IST2014-07-08T00:53:26+5:302014-07-08T00:53:26+5:30
उदय सामंत; मंगळवेढ्यातील बैठकीत आश्वासन

पाण्यासाठी स्वतंत्र फिडर देणार
मंगळवेढा : मंगळवेढा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उचेठाण येथे स्वतंत्र फिडर व नगरपालिकेसाठी आठवडाभरात स्वतंत्र अभियंता दिला जाईल. कृष्णा तलाव सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती नगरविकासमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उचेठाण येथे स्वतंत्र फिडर नसल्यामुळे शहराला लोडशेडिंग कालावधीमध्ये पाणीपुरवठा करण्यात व्यत्यय येत आहे. जिल्हा रुग्णालय व पाणीपुरवठा यासाठी एक्स्प्रेस फिडर राज्यात सगळीकडे बसविण्याचा निर्णय झाला आहे. एक्स्प्रेस फिडरसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांच्याशी चर्चा करून त्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. मंगळवेढा नगरपालिकेला पूर्णवेळ नगर अभियंता नसल्यामुळे पाच कोटींची विकासकामे रखडली असल्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर सामंत म्हणाले की, येत्या आठवडाभरात अभियंता दिला जाईल.
दरम्यान, मुख्याधिकारी शिल्पा दरेकर या प्रभावीपणे काम करीत नसल्यामुळे त्यांची बदली करून सक्षम अधिकारी नेमावा, अशी मागणी नगराध्यक्ष धनंजय खवतोडे यांनी मंत्र्यांकडे केली. याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन सामंत यांनी दिले. याचबरोबर कृष्णा तलाव विकसित करणे, सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकामास व भुयारी गटार योजना, शहरातील रस्ते व आरक्षित जागा विकसित करणे आदींसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी खवतोडे यांनी केली.
नगरपालिकेकडे सध्या २२ सफाई कर्मचारी कार्यरत असून, शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणखी २५ सफाई कामगारांची आवश्यकता आहे. ही पदे वाढवून मिळावीत, या मागणीचे निवेदन यावेळी बहुजन रयत परिषदेचे अध्यक्ष खंडू खंदारे यांनी दिले.
यावेळी आ. भारत भालके, आ. दीपक साळुंखे, नगराध्यक्ष धनंजय खवतोडे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, पक्षनेते भारत नागणे, विरोधी पक्षनेते अजित जगताप, नगरसेवक महादेव जिरगे, चंद्रखेशर कोंडुभैरी, सुनील नलवडे, गौरीशंकर बुरकूल, दत्तात्रय यादव, विलास मोडक, मुरलीधर घुले, रामचंद्र कोंडुभैरी, कैलास कोळी, विजय बुरकूल, बाबा कोंडुभैरी उपस्थित होते.