सातारा : ‘महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील पाणी वाटपाची सद्य:स्थिती काय आहे?, याबाबतची विचारणा करणारी नोटीस राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाला धाडली आहे,’ अशी माहिती माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. येळगावकर म्हणाले, ‘आघाडी शासनाने माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांना तहानेनं व्याकूळ ठेवून अन्याय केला आहे, या शासनाचं काळेबेरं लवकरच बाहेर काढणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडेही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दि. ५ आॅगस्ट रोजी सुनावणी झाली. शासनाच्या वतीने जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आर. व्ही. पानसे हे सुनावणीसाठी हजर होते. प्राधिकरणाने दि. २० पर्यंत सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील किती गावांना टेंभू योजनेचा लाभ मिळणार आहे?, दुसऱ्या पाणी योजनेचा किती गावांना लाभ मिळाला?, ज्या गावांना पाणी योजनांचा लाभ मिळणार नाही, अशा गावांची नावे आणि त्यांना पाणी योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना, यांची माहिती मागितली आहे.’डॉ. येळगावकर पुढे म्हणाले,‘या योजनेच्या माध्यमातून ८० हजार ४७२ हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील केवळ ६०० हेक्टर जमिनीलाच याचा लाभ मिळणार आहे. बाकीचे पाणी जिल्ह्याबाहेर पळविण्यात आले आहे. राज्य शासनाने जलनीतीचे पूर्णपणे उल्लंघन केले आहे.’ (प्रतिनिधी)
सातारा, सांगली, सोलापुरातील पाणी वाटपाची माहिती द्या
By admin | Updated: August 8, 2014 00:40 IST