महापालिकास्तरावच होणार प्रभागरचना
By Admin | Updated: August 23, 2016 20:26 IST2016-08-23T20:26:19+5:302016-08-23T20:26:19+5:30
महापालिकेच्या नव्या निवडणुकीसाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रभाग रचनेसाठी निवडणूक आयोगातर्फे संगणकीय साफ्टवेअरचा वापर करण्यात येणार होता.

महापालिकास्तरावच होणार प्रभागरचना
सोलापूर : महापालिकेच्या नव्या निवडणुकीसाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रभाग रचनेसाठी निवडणूक आयोगातर्फे संगणकीय साफ्टवेअरचा वापर करण्यात येणार होता. पण सॉफ्टवेअरची चाचणी यशस्वी न झाल्याने महापालिका स्तरावरच प्रभाग रचना तयार करण्याची सूचना निवडणूक आयोगाने दिली आहे.
मनपा निवडणूक तयारीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी राज्यातील महापालिकांच्या अधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सला आयुक्त विजयकुमार काळम, उप आयुक्त श्रीकांत मायकलवार, नगररचना विभागाचे सहायक संचालक महेश क्षीरसागर आदी उपस्थित होते. मतदार जागृती व नवीन मतदार नोंदणीबाबत वॉर्डस्तराव मोहीम घ्या. युवकांचे मतदान शंभर टक्के व्हावे यासाठी प्रयोग व्हावेत. नव्याने करण्यात येणाऱ्या प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगामार्फत साफ्टवेअर पुरविण्यात येणार होते. पण याची चाचणी यशस्वी न झाल्याने महापालिकांकडे उपलब्ध असलेल्या मॅन्युअल रचनेवर नव्या प्रभागांची मांडणी मनपा स्तरावरच करण्यात यावी असे सुचित करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने यापूर्वीच प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानंतर सोमवारी व्होटिंग मशीनच्या सुरक्षेबाबत आदेश काढले आहेत. ४0 पानी अद्यादेशात आयोगाने व्होटिंग मशीन सुरक्षेसाठी राखीव ठेवलेल्या गोदामाबाबत नियमावली दिली आहे. महापालिकेने २३00 ईव्हीएम ठेवण्यासाठी गोदामाची तयारी सुरू केली होती. पण आयोगाने पहिल्या टप्प्यात दीड हजार व दुसऱ्या टप्यात दीड असे तीन हजार इव्हीएम पुरविली जातील असे स्पष्ट केले आहे. ईव्हीएम ठेवण्यासाठी मोठे गोदाम, त्या गोदामाची बाह्य व अंतर्गत सुरक्षा कडक असावी. सीसी कॅमेरे, फायर फायटिंग यंत्रणा आदीबाबत नकाशासह आयोगाला माहिती सादर करण्याबाबत कळविले आहे. त्यामुळे असे गोदाम तयार करण्याबाबत बांधकाम विभागाला पत्र दिल्याची माहिती उप आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिली.
प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केल्याने महापालिकेने यापूर्वी दिलेल्या रचनेप्रमाणे तयारी करण्यात येत आहे. ४ वॉर्डाचे २४ व तीन वॉर्डाचे २ प्रभाग होणार आहेत. प्रभागांची रचना कशापद्धतीने करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी
मनपा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याने या विभागात कर्मचारी वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे आयुक्तांकडे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केल्याचे उप आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सांगितले. प्रभाग रचनेची सोडत व इतर प्रक्रिया आॅनलाईन निवडणूक आयोगाला कळवावी लागणार आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. ईव्हीएमसाठी शासकीय गोदामाची मागणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.