मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण गरम

By Admin | Updated: January 28, 2017 12:28 IST2017-01-28T12:28:31+5:302017-01-28T12:28:31+5:30

मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण गरम

The political atmosphere in Mohol taluka is hot | मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण गरम

मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण गरम

मोहोळ तालुक्यातील राजकीय वातावरण गरम
अशोक कांबळे : मोहोळ आॅनलाईन लोकमत
फेबु्रवारीमध्ये होणाऱ्या मोहोळ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तालुक्यात सर्वच पक्षांतील राजकीय वातावरण तापले आहे़ प्रत्येक पक्षाच्या बैठका, मुलाखती, चांगला उमेदवार कोण, मालदार उमेदवार कोण याची चाचपणी पक्षप्रमुख करीत आहेत़ माजी आमदार राजन पाटील यांची एकहाती सत्ता असलेल्या मोहोळ तालुक्यात विरोधकांनी राजन पाटील यांची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी चंग बांधला आहे़
दरम्यान, मोहोळ तालुक्यात सर्व विरोधकांचा एकच विरोधक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांच्या हातात असलेली एकहाती सत्ता थोपविण्याची तयारी सर्व विरोधक करत आहेत़ यासाठी भीमा परिवाराचे धनंजय महाडिक, माजी सभापती विजयराज डोंगरे, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह अन्य समविचारी पक्ष व संघटना एकत्र येऊ पाहत आहेत़ त्यात शिवसेना व भाजपाही तयार आहे़ परंतु आघाडीत प्रत्येक पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या जागेवर आपापल्या चिन्हावर निवडणुका लढवाव्यात, अशी भूमिका सेना व भाजपा कार्यकर्ते घेत आहेत़परंतु भीमा परिवाराचे धनंजय महाडिक यांनी आघाडी करायची असेल तर सर्व जागा आघाडीच्या चिन्हावरच लढवाव्या लागतील, अशी भूमिका घेतली आह़े़ ज्यांना यायचे आहे त्यांनी या अनुषंगानेच महाआघाडीत सामील व्हावे, या निर्णयात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे मत काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आह़े़ त्यामुळे महाआघाडीला ब्रेक लागला असून, आता सेना-भाजपा अंतिम क्षणी कोणता निर्णय घेणार तर इतर संघटना काय पाऊल उचलणार, यावरच महाआघाडीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे़
मोहोळ जि. प़ व पं़ स़ ची निवडणूक लागली असून, गेली २५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता रोखण्यासाठी सेना-भाजपा व अन्य मित्रपक्ष लढत आले आहेत. परंतु आजतागायत विरोधकांना यश मिळाले नाही़ राष्ट्रवादीची एकहाती सत्ता अबाधित ठेवण्यात राजन पाटील यशस्वी ठरले आहेत़राजन पाटील यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे माजी जिल्हा अध्यक्ष मनोहर डोंगरे असायचे, परंतु आता होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर राजन पाटील व मनोहर डोंगरे यांच्यातच उभी फूट पडली आहे़ त्यामुळे आता ही निवडणूक राजन पाटील व मनोहर डोंगरे या दोघांच्या अस्तित्वाची निवडणूक ठरणार आहे़
या पार्श्वभूमीवर माजी सभापती विजयराज डोंगरे यांनी धनंजय महाडिक यांच्या भीमा परिवाराबरोबर आघाडी केली आहे़ या आघाडीत धनंजय महाडिक, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, कॉगे्रसचे माजी जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील, जनहित शेतकरी संघटनेचे भैय्यासाहेब देशमुख हे आहेत़
तालुक्यातील आता सर्वच विरोधकांचा ऐक्य विरोधक म्हणून राजन पाटील यांचा राष्ट्रवादी पक्ष बनला आहे़ या राष्ट्रवादीला रोखण्यासाठी भीमा परिवारासोबत आघाडी करण्यासाठी सर्वच जण तयार आहेत़ या सर्व पक्षांच्या स्थानिक नेत्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत बैठका झाल्या, परंतु सेना-भाजपाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आघाडी करुन वाट्याला येणाऱ्या जागा पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याची भूमिका घेतली आहे़ त्यावर एकमत न झाल्याने अजून तरी आघाडीचे सुत जमले नाही़ आघाडी होणार का, असा प्रश्न अनुत्तरित असतानाच या आघाडीतील नेते, काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील यांनी आघाडीत कोणी बी येवो, आमचे दरवाजे खुले आहेत़ परंतु आमच्या आघाडीच्याच चिन्हावर होणारी निवडणूक लढवावी लागेल, यात कोणताही बदल अथवा तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितल्याने मोहोळ तालुक्यातील महाआघाडीचे घोडे वेशीतच थांबले आहे़ भीमा परिवाराच्या या भूमिकेवर आता सेना-भाजपा काय निर्णय घेणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे़

Web Title: The political atmosphere in Mohol taluka is hot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.