पोलिसांनी सुरू केली मोबाईल तपासणी
By Admin | Updated: June 8, 2014 01:12 IST2014-06-08T01:12:24+5:302014-06-08T01:12:24+5:30
आक्षेपार्ह मजकूर असेल तर होणार कारवाई

पोलिसांनी सुरू केली मोबाईल तपासणी
सोलापूर : गेल्या आठवड्यातील फेसबुक प्रकरणानंतर अशा घटना टाळण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी मोबाईल हँडसेट तपासणीची मोहीम उघडली आहे. अचानकपणे नाकेबंदी करून हँडसेट तपासले जात असून, आक्षेपार्ह मजकूर सेव्ह असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक मकरंद रानडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना ही मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे करमाळा, बार्शी, कुर्डूवाडी, टेंभुर्णी, मंगळवेढा, मोहोळ हद्दीत अशी तपासणी सुरू झाली आहे. व्हॉट्सअप व फेसबुकवर बदनामीकारक, अश्लील व अफवा पसरविणारे मजकूर, फोटो अपलोड केले जातात. यामुळे विनाकारण तणाव वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे. नाकेबंदीत वाहनचालकाजवळ असलेला मोबाईल हँडसेट घेऊन फोटो व व्हिडीओ फोल्डरची तपासणी केली जात आहे. पहिल्यांदा असा मजकूर डिलीट करून संबंधितास ताकीद दिली जात आहे. नजीकच्या काळात अशा मोहिमेत मोबाईलमध्ये आक्षेपार्ह मजकूर, फोटो, व्डिडीओ असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलिसांच्या या मोहिमेमुळे गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात व्हॉट्सअप वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे.
--------------------------
पोलीस अधीक्षकांनी केलेल्या सूचनेवरून बार्शी व कुर्डूवाडी येथे अशा तपासण्या सुरू केल्या आहेत. सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या पोलीस भरतीमुळे संबंधितांना ताकीद देण्यात येत आहे. मोबाईलधारकांनी संवाद व इतर चांगल्या गोष्टींचा वापर करावा. वादग्रस्त गोष्टींमुळे कदाचित ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.
-पो. नि. नितीन कौसडीकर
स्थानिक गुन्हे शाखा