पेटत्या चितेवरून महिलेस पोलिसांनी घेतले ताब्यात; अन् खुनाला फुटली वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:15 IST2021-07-09T04:15:35+5:302021-07-09T04:15:35+5:30
यात मयताचे पती मनोज पांडुरंग राऊत, दीर श्रीकांत पांडुरंग राऊत (रा. फोंडशिरस), आई सुरेखा गौतम गवळी, भाऊ विशाल गौतम ...

पेटत्या चितेवरून महिलेस पोलिसांनी घेतले ताब्यात; अन् खुनाला फुटली वाचा
यात मयताचे पती मनोज पांडुरंग राऊत, दीर श्रीकांत पांडुरंग राऊत (रा. फोंडशिरस), आई सुरेखा गौतम गवळी, भाऊ विशाल गौतम गवळी (रा. दसूर) यांना पोलिसांनी न्यायालयात दाखल केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत घडलेली हकीकत अशी की, पल्लवी मनोज राऊत (वय २८) या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती नातेपुते पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी मयताचे सासर व माहेरकडील नातेवाइकांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने अग्नी देण्याची गडबड सुरू केली होती. याबाबत पोलिसांनी हस्तक्षेप करून पोलिसी खाक्या दाखवताच मयताचा पती, दीर यांच्यासह आई-भाऊ यांनी मयत पल्लवी हीस मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे मारल्याची माहिती समोर आली.
----
पोलीस झाले फिर्यादी..
दीड वर्षापासून मनोज राऊत व त्याची मयत पत्नी यांच्यात कलह होता. यात मयत पल्लवी ही घरातून न सांगता निघून गेली होती. परत आल्यानंतर कलह वाढत गेले. आई, भाऊ, पती, दीर समक्ष झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे पोलीस मसाजी थोरात यांच्यासह पथकाने केलेल्या कारवाईत समोर आले. यात फिर्याद देण्यासाठी कोणीच पुढे येत नसल्यामुळे अखेर पोलीस नवनाथ माने यांनी फिर्याद दिली. सदर प्रकरणातील पुढील तपास सपोनि. मनोज सोनवलकर करीत आहेत.