फड जिंकला पण गावकारभारी पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:47 IST2021-02-05T06:47:04+5:302021-02-05T06:47:04+5:30

कुर्डूवाडी: माढ्यात गावागावांचे सरपंचपदाचे आरक्षणानंतर अनेक गावांमधून सरपंचपदासाठी रस्सीखेच सूरू झाली तर काही गावांनी सरपंचपदाचे आरक्षण ठराविक प्रवर्गाला जाहीर ...

Phad won but the villager fell | फड जिंकला पण गावकारभारी पडला

फड जिंकला पण गावकारभारी पडला

कुर्डूवाडी: माढ्यात गावागावांचे सरपंचपदाचे आरक्षणानंतर अनेक गावांमधून सरपंचपदासाठी रस्सीखेच सूरू झाली तर काही गावांनी सरपंचपदाचे आरक्षण ठराविक प्रवर्गाला जाहीर झाल्याने व दावेदार उमेदवारही तिथे एकच असल्याने गावकारभारी निश्चित झाले आहेत. यामध्ये भुताष्टे, अकुलगाव, बारलोणी येथे महिलाराज निर्माण झाले आहे. काही ठिकाणी विरोधी गटात सरपंचपदाचा उमेदवार निवडून आल्याने ‘गफड जिंकला पण सरपंचपदाचा दावेदार गावकारभारी पडला’ अशी अवस्था झाली आहे.

उपळवाटे गावात सरपंचपदात रस्सीखेच सुरु आहे तर अकुलगाव, लव्हे येथे सरपंचपद आरक्षित झाल्याने विरोधकांच्या हातात सत्ता गेली. लव्हेमध्ये तर सरपंचपद हे अनुसूचित जाती महिला आरक्षित झालं आहे आणि येथे या प्रवर्गातील पुरुष उमेदवार गावातून निवडून आल्याने याची तक्रार तहसीलदारांंकडे दाखल झाली आहे. अद्याप सरपंच निवडीचा कार्यक्रम ठरलेला नाही.

भुताष्टेत ११ जागेसाठी माजी सरपंच सुरेश यादव,शहाजी यादव, राजेंद्र यादव,सुधीर यादव यांच्या ग्रामविकास आघाडी विरुद्ध माजी सरपंच गजानन यादव, हनुमंत यादव, भास्कर यादव यांच्या मेसाई ग्रामविकास आघाडीत झुंज झाली. त्यामध्ये ग्रामविकास आघाडीने बाजी मारीत ११ पैंकी ७ जागेवर विजय मिळवला. येथे सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेला आरक्षित असल्याने मंदाकिनी सुरेश यादव यांचे नाव निश्चित मानले जात आहे. मात्र उपसरपंच पदासाठी रस्सीखेच निर्माण झाली आहे. तर चिंचगाात ९ जागेसाठी भास्कर उबाळे व महादेव उबाळे यांच्या संजयमामा शिंदे ग्रामविकास आघाडीच्या विरोधात चंद्रकांत पाटील यांच्या महाविकास आघाडीत चुरशीची लढत झाली. त्यामध्ये ५ जागेवर भास्कर उबाळे यांच्या गटाने विजय प्राप्त केला. तर ४ जागेवर चंद्रकांत पाटील यांच्या गटाला समाधान मानावे लागले. येथील सरपंचपद ओबीसी सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित असल्याने भास्कर उबाळे गटाचे राजेंद्र बन्सी सुतार यांची निवड निश्चित मानली जात आहे. याबरोबरच बारलोणी- गवळेवाडी ग्रामपंचायतीत संचालक सुरेश बागल व माजी सरपंच संतोष लोंढे यांच्या जय बजरंग बली ग्रामविकास पॅनलने माजी पंचायत समिती सदस्य व्यंकटेश पाटील यांच्या जय हनुमान ग्रामविकास पॅनलचा निवडणुकीत धुव्वा उडवला. येथील सरपंचपद ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित आहे. येथे प्रियंका आतकर व प्रियंका गुंजाळ या दोन महिला रेसमध्ये आहेत.

उपळवाटे ग्रामपंचायतीत यंदा अतुल खूपसे पाटील यांच्या गटाचा धुव्वा उडाला. आ.संजयमामा शिंदे गटाची एकहाती सत्ता आली. येथे आ बबनदादा शिंदे व आ संजयमामा शिंदे प्रस्तुत श्री भैरवनाथ ग्रामविकास विकास आघाडीच्या पॅनेलने सर्व ९ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आहे. येथील सरपंचपद हे सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित असल्याने येथे रस्सीखेच आहे. परंतु पार्टीलीडर लक्ष्मण खूपसे, उद्धव माळी यांनी ग्रीन सिग्नल देईल तोच येथील प्रथम सरपंच होणार आहे.

----

सत्ता आली.. सरपंच दुसऱ्या गटात

याबरोबर अकुलगाव येथे माजी सरपंच दत्तात्रय जगताप गटाला ९ पैंकी ४ जागा मिळाल्या होत्या. तर अनंत पाटील गटाला ५ जागा मिळाल्याने सत्ता प्रस्थापित करण्यासाठी संधी मिळाली परंतु गावाला सरपंच पदाचे आरक्षण मागासवर्गीय महिलेला आरक्षित झाल्याने ही जागा फक्त जगताप गटाकडेच असल्याने सत्तेतील पाटील गटाला सरपंच पदापासून हुकावे लागणार आहे. येथून राजश्री बोबडे या एकमेव अनुसूचित जातीच्या महिला उमेदवार निवडून आल्या आहेत.

---

लव्हे गावात झालं त्रांगडं

लव्हे गावातही सरपंचपद हे अनुसूचित जाती महिला वर्गासाठी आरक्षित आहे. येथून हरिचंद्र चव्हाण यांच्या गटाचा निवडणूकित पराभव करीत हनुमंत जाधव गटाने ९ पैंकी ६ जागेवर विजय मिळवला होता. परंतु गावाला सरपंचपद अनुसूचित जाती महिला उमेदवाराला आरक्षित असल्याने येथे गोंधळ उडाला आहे. येथेही अनुसूचित जातीचा उमेदवार जाधव गटाकडे नसल्याने त्यांना आता गावच्या सरपंचपदापासून मुकावे लागणार आहे. येथील गोंधळ अद्यापपर्यंत मिटला नाही. याबाबत तहसीलदार यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे.

.....................

Web Title: Phad won but the villager fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.