सुरक्षा ठेव न भरता फक्त चालू बिल भरले; साडेपाच लाख ग्राहकांकडे १८१ कोटी थकले
By Appasaheb.patil | Updated: August 10, 2023 14:44 IST2023-08-10T14:43:44+5:302023-08-10T14:44:33+5:30
...या मुदतीनंतरही रक्कम भरली नाही तर नाईलाजाने संबंधितांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.

प्रतिकात्मक फोटो
सोलापूर : लघु व उच्चदाब वीजग्राहकांना गेल्या एप्रिल व मे महिन्याच्या वीजबिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत सोलापूर जिल्ह्यात ५ लाख ५७ हजार ४७५ ग्राहकांकडे १८१ कोटी १६ लाखांची थकबाकी आहे. या सर्व ग्राहकांना सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यासाठी महावितरणकडून ३० दिवसांच्या मुदतीची नोटीस देण्यात येत आहे. या मुदतीनंतरही रक्कम भरली नाही तर नाईलाजाने संबंधितांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले.
मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक (कृषी ग्राहक) असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते. त्याप्रमाणे वीजग्राहकांनी याआधी भरलेली सुरक्षा ठेव व नियमानुसार आवश्यक असलेली ठेव यातील फरकाच्या रकमेचे स्वतंत्र बिले गेल्या एप्रिल व मे महिन्यात देण्यात आली आहेत.