पंढरपुरात संचारबंदी उरली केवळ नावालाच; दुकाने खुलेआम सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST2021-08-21T04:26:25+5:302021-08-21T04:26:25+5:30
संचारबंदीच्या पहिले एक-दोन दिवस प्रशासनाने पंढरपुरातील प्रमुख मार्ग, बाजारपेठा, तालुक्यात नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली. मात्र, त्यानंतर संचारबंदीत समाविष्ट ...

पंढरपुरात संचारबंदी उरली केवळ नावालाच; दुकाने खुलेआम सुरूच
संचारबंदीच्या पहिले एक-दोन दिवस प्रशासनाने पंढरपुरातील प्रमुख मार्ग, बाजारपेठा, तालुक्यात नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली. मात्र, त्यानंतर संचारबंदीत समाविष्ट नसलेली कापड, ज्वेलरी, हॉटेल, मंदिर परिसरातील प्रसादिक दुकाने व इतर छोटी-मोठी दुकाने खुलेआम सुरू आहेत. ठिकठिकाणी शेकडो लोकांची गर्दी होत असते. अनेक व्यावसायिक दुकाने अर्धी उघडी ठेऊन गर्दी करताना दिसत आहेत.
अधिकारी बदलताच प्रशासन ढिम्म
गेल्या दोन वर्षांच्या काळात पंढरपुरात विधानसभा पोटनिवडणूक, दोन आषाढी यात्रा सोहळे, वर्षभरात इतर भरणाऱ्या यात्रा सोहळे, लग्नसोहळे, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना थोपवत कोरोना आटोक्यात आणण्याचे काम तत्कालीन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी इतर प्रशासनाला सोबत घेऊन योग्यपणे हाताळले होते. मात्र, त्यांची पंधरा दिवसांपूर्वी पुणे येथे बसली झाली. त्यानंतर स्थानिक प्रशासनात कोणताही समन्वय असल्याचे चित्र दिसत नाही. पोलीस आपआपल्यापरीने काही ठिकाणी मास्क, लायसन्स चेक करत दंड वसूल करण्यात मग्न असतात. आरोग्य विभाग म्हणते आमच्या चाचण्या सुरू आहेत. पंचायत समिती, नगरपालिका प्रशासनामध्ये एकवाक्यता दिसून येत नाही.
रुग्णवाढीचा दर कायम
पंढरपुरात ५० वर आलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा १०० ते १२० पर्यंत पोहोचली होती. येणारा सणासुदीचा काळ लक्षात घेता होणारी गर्दी गृहित धरून ही रुग्णसंख्या आणखी वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने पंढरपुरात संचारबंदी लागू केली. त्याला विरोधही झाला. त्यानंतरही पंढरपुरात गेल्या आठ दिवसांमध्ये शेकडो चाचण्या घेण्यात आल्या. मात्र, रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. ती रुग्णसंख्या ८० ते १५० च्या दरम्यान सापडतच असल्याने रुग्णवाढीचा दर कायम असल्याचे चित्र आहे.