अन्यथा स्वबळावर रिपब्लिकन पक्षांची भूमिका, बसपाकडे ४५ अर्ज दाखल
By Admin | Updated: January 24, 2017 19:47 IST2017-01-24T19:47:04+5:302017-01-24T19:47:04+5:30
अन्यथा स्वबळावर रिपब्लिकन पक्षांची भूमिका, बसपाकडे ४५ अर्ज दाखल

अन्यथा स्वबळावर रिपब्लिकन पक्षांची भूमिका, बसपाकडे ४५ अर्ज दाखल
अन्यथा स्वबळावर रिपब्लिकन पक्षांची भूमिका, बसपाकडे ४५ अर्ज दाखल
संताजी शिंदे - सोलापूर
सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या विविध गटांनी सध्या जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पक्षाने भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष, एमआयएमसारख्या पक्षांशी युती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. झाली तर आघाडी; अन्यथा स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारीही या पक्षांनी ठेवली आहे. बहुजन समाज पार्टी स्वबळावर निवडणूक लढविणार असून ४५ इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे प्राप्त झाले आहेत. महानगरपालिकेची निवडणूक जशी जवळ येत आहे, तशा पक्षपातळीवर हालचाली वाढल्या आहेत. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) पक्षाकडे सध्या १३ इच्छुकांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. देशापातळीवर भारतीय जनता पक्षासोबत रिपाइं (आठवले) यांची युती झाली आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतही रिपाइंची युती असणार आहे. याबाबत प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व शहर अध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी व सरचिटणीस विक्रम देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे १३ जागांची मागणी केली आहे. पालकमंत्र्यांनी चर्चा करून दोन दिवसांत कळविणार असल्याचे सांगितले. आघाडी झाली तर उत्तम आहे; अन्यथा स्वबळावर निवडणूक लढविण्याचे आदेश केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिले आहेत. दि. २२ जानेवारी रोजी इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई) ने निवडणुकीत २५ जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पक्षाकडे १६ अर्ज दाखल झाले असून, अन्य उमेदवारांशी चर्चा सुरू आहे. प्रभाग क्र. १२, १९ आणि २२ मध्ये इच्छुकांचे १२ अर्ज प्राप्त झाले आहेत. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने काँग्रेस पक्षाशी वाटाघाटी सुरू आहेत. दोन दिवसांत पार्लमेंटरी बोर्डाची रचना होईल. पक्षाकडे १५ इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. निवडणुकीबाबत पक्षश्रेष्ठींचे पत्र गुरुवारी प्राप्त होणार असून, पुढील भूमिका ठरवली जाईल. आघाडी झाली तर ठीक; अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी प्रदेश उपाध्यक्ष राजा इंगळे यांनी ठेवली आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (पी.जी.) कडे १३ इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. पक्षाची पहिलीच महानगरपालिका निवडणूक असून आघाडीबाबत एम.आय.एम.सोबत बोलणी सुरू आहे. आघाडी झाली तर एस.सी.च्या जागा काही खुल्या वर्गातील तर काही ओबीसीच्या मिळून १३ जागा सोडण्याची मागणी केली आहे. पक्ष स्वत:च्या चिन्हावरच निवडणूक लढविणार आहे. प्रदेशाध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्याशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी संपर्क साधून उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केली आहे. दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल. दरम्यान रिपाइं पी. जी. ग्रुप आणि एमआयएमच्या वतीने शुक्रवारपासून त्यांच्याकडे इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही पक्षाचे प्रमुख प्रमोद गायकवाड व तौफिक शेख यांनी काही इच्छुकांच्या शुक्रवारी मुलाखतीही घेतल्या. -------------------------------------
केंद्रात आणि राज्यात भाजप-सेनेची युती पाहता बहुतांश पक्षांनी आघाडीबाबत वाटाघाटी करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूरमध्ये पहिल्यांदाच काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आली आहे. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी एकमेकांमध्ये आघाडी सुरू असताना दुसरीकडे बहुजन समाज पार्टीने नेहमीप्रमाणे एकला चलो रे... ही भूमिका कायम ठेवली आहे. पक्षाचे ४५ उमेदवारांनी अर्ज नेले असून यात मराठा, चर्मकार, मोची, बौद्ध, गुरव, मुस्लीम, मातंग समाजाचा समवेश आहे. दि. १९ जानेवारी रोजी ८0 उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. दरम्यान दुसऱ्या टप्यातील उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. इच्छुकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब लोकरे यांच्याशी काही उमेदवार संपर्कात आहेत.