शर्यतीतील बैलाने धडक मारल्याने एकाचा मृत्यू, अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील घटना
By विलास जळकोटकर | Updated: June 6, 2023 16:58 IST2023-06-06T16:58:13+5:302023-06-06T16:58:19+5:30
बैलांची शर्यत पाहण्यासाठी म्हणून बसलेल्या व्यक्तीला बैलाने धडक देऊन काही अंतर फरपटत नेले.

शर्यतीतील बैलाने धडक मारल्याने एकाचा मृत्यू, अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील घटना
सोलापूर : बैलांची शर्यत पाहण्यासाठी म्हणून बसलेल्या व्यक्तीला बैलाने धडक देऊन काही अंतर फरपटत नेले. यात जखमी होऊन व्यक्तीचा मृत्यू झाला ही घटना रविवारी सायंकाळी 5:30 च्या सुमारास अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावात घडली. साहेबलाल मनापसाब मुल्ला (वय ६०) असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
रविवारी वागदरी गावात बैलांची शर्यत होती. ही शर्यत गाव परिसरातील मोकळ्या मैदानात ठेवण्यात आली होती. शर्यत बघण्यासाठी वागदरी गावासह परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी साहेबलाल हेही शर्यत पाहण्यासाठी तेथे गेले होते शर्यतीत धावणाऱ्या बैलाने त्यांना धडक दिली. त्यानंतर तसेच काही अंतर पुढे फरपटत नेले. यामुळे साहेब लाल हे डोक्याला, पायाला, हाताला तसेच सर्वांगास मार लागून जखमी झाले होते.
त्यांच्यावर अक्कलकोट येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर मुलगा इमाम यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल केले. परंतु सोमवारी रात्री उपचारादरम्यान साहेबलाल मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.