दीड लाख ग्राहकांनी भरली वीजबिले ऑनलाईन

By Admin | Updated: March 9, 2017 17:24 IST2017-03-09T17:24:41+5:302017-03-09T17:24:41+5:30

महावितरणच्या बारामती परिमंडलातील जवळपास दीड लाख ग्राहकांनी मागील महिन्यात वीजबिलांपोटी १९ कोटी रुपयांहून अधिक

One and a half million subscribers filled the electricity bill online | दीड लाख ग्राहकांनी भरली वीजबिले ऑनलाईन

दीड लाख ग्राहकांनी भरली वीजबिले ऑनलाईन

>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 9 - महावितरणच्या बारामती परिमंडलातील जवळपास दीड लाख ग्राहकांनी मागील महिन्यात वीजबिलांपोटी १९ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा ऑनलाईन भरणा केला आहे. महावितरणने संकेतस्थळासोबतच मोबाईल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर वीजबिले ऑनलाईन भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याची स्थिती आहे. 
महावितरणने www.mahadiscom.in या वेबसाईटवर ऑनलाईन बिल पेमेंट सुविधेसह महावितरण मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. सर्व लघुदाब ग्राहकांना चालू व मागील बिले पाहणे आणि भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वॉलेट व कॅश कार्ड्‌सचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपवरून वीजबिल भरण्यास ग्राहकांची पसंती वाढलेली आहे.
फेब्रुवारी महिन्यात बारामती परिमंडलात १ लाख ४६ हजार ९१४ वीजग्राहकांनी १९ कोटी ३८ लाख रुपयांच्या वीजबिलांचे ऑनलाईन पेमेंट केले आहे. यात बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील २६ हजार ३५८ ग्राहकांनी ५ कोटी ३० लाख, सोलापूर मंडलातील ३८ हजार ६४५ ग्राहकांनी ६ कोटी १६ लाख तर सातारा मंडलातील ८१ हजार ९११ ग्राहकांनी ७ कोटी ९२ लाख रुपयांची वीजबिले ऑनलाईन भरली आहेत. या माध्यमातून ग्राहकांना वीजबिल ऑनलाईन भरण्याचे महत्त्व पटत असल्याचे दिसत आहे. आता इंटरनेट व मोबाईलच्या माध्यमातून वीजबिल  भरण्याकडे  ग्राहकांचा कल वाढत चालल्याने बिल भरणा केंद्रांसमोर रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत आहे. 
महावितरणने लघुदाब ग्राहकांना वीजबिल ऑनलाईन भरण्यासह ई-मेलद्वारे वीजबिल मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच छापील कागदाऐवजी 'गो-ग्रीन' संकल्पनेअंतर्गत वीजबिलाच्या फक्त ई-मेलचा पर्याय स्वीकारल्यास दरमहा तीन रुपये सूट दिली जात आहे. तथापि, छापील कागदासह ई-मेलद्वारेही वीजबिल मिळविण्याची सोय उपलब्ध आहे. याबाबतची माहिती www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय मुदत संपल्यानंतरही विलंब शुल्काच्या रकमेसह वीजबिल ऑनलाईन भरण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या ऑनलाईन बिल भरण्याच्या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बारामती परिमंडलाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: One and a half million subscribers filled the electricity bill online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.