आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात गुन्हा
By Admin | Updated: February 20, 2017 04:02 IST2017-02-20T04:02:40+5:302017-02-20T04:02:40+5:30
भारतीय सैनिकांबद्दल आणि त्यांच्या पत्नींबद्दल बेताल वक्तत्व करणारे भाजपाचे विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांच्याविरोधात

आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात गुन्हा
सोलापूर : भारतीय सैनिकांबद्दल आणि त्यांच्या पत्नींबद्दल बेताल वक्तत्व करणारे भाजपाचे विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांच्याविरोधात शिवसेनेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आ. परिचारक यांनी आपल्या विधानाबद्दल माफी मागितली असली, तरी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अांदोलन करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
जिल्हा परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या भोसे (ता. पंढरपूर) येथील प्रचारसभेत बोलताना आ. प्रशांत परिचारक यांनी भारतीय सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते़ या विधानाची क्लीप सोशल मिडियावर वेगाने पसरली़ त्यामुळे परिचारक यांच्यावर सर्वस्तरातून टिकेची झोड उठली. अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. सकल मराठा समाजाच्यावतीने परिचारक यांच्या प्रतिमेवर जोडेमार आंदोलन करण्यात आले़ शिवसैनिकांनीही परिचारक यांच्या प्रतिमेस चप्पलचा हार घालीत आंदोलन केले़ शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रताप चव्हाण व महेश धाराशिवकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर आ. परिचारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, परिचारक यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेऊन आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली़ ते म्हणाले, ते वक्तव्य अनावधानाने झाले आहे. सैनिकांबद्दल मला विशेष आदर आहे. सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून देशाचे रक्षण करतात. त्यांचा अपमान माझ्याकडून होणे शक्य नाही. माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. (प्रतिनिधी)