शासकीय कामात अडथळा; दोघा टेम्पोचालकांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:15 IST2021-07-09T04:15:28+5:302021-07-09T04:15:28+5:30
तहसीलदार अभिजित पाटील यांच्या आदेशान्वये तलाठी वाय. डी. बोधनवाड व शिपाई विनय अटक हे दोघे गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ...

शासकीय कामात अडथळा; दोघा टेम्पोचालकांविरुद्ध गुन्हा
तहसीलदार अभिजित पाटील यांच्या आदेशान्वये तलाठी वाय. डी. बोधनवाड व शिपाई विनय अटक हे दोघे गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास वासुद रोड येथे जात असताना समोरून विनानंबरचा टेम्पो येताना दिसला. त्यांनी त्यास थांबविले असता चालक नवाज अकबर खतीब-मुलाणी (रा. कडलास रोड) याने गाडीतूनच तू कोण आहेस, माझी गाडी का थांबवतो असे म्हणून शिपाई विनय अटक यांच्या गच्चीला धरून बाजूला ढकलून देऊन पुढे निघून गेला.
काही वेळातच दुसरा एक विनानंबर टेम्पो आडवा आल्याने त्यासही थांबविले. वाहन थांबल्यानंतर चालकाने खाली उतरून काय पाहिजे, अशी दोघांकडे विचारणा केली. यावेळी तलाठी व शिपाई या दोघांनी टेम्पोची तपासणी केली असता पाठीमागील हौद्यामध्ये वाळू भरून कोठेतरी खाली करून रिकामा निघाला होता. त्यामुळे हौद्यात थोडीफार वाळू शिल्लक होती. त्या दोघांनी आम्ही तहसील कार्यालयातील कर्मचारी आहोत, अशी ओळख सांगत असताना टेम्पो चालक बजरंग ऊर्फ बापू लेंडवे (रा. जांगळे वस्ती, सांगोला) याने माझे वाहन अडविण्याचा तुमचा काय अधिकार, असे म्हणून शिवीगाळ करीत विनय अटक यांच्या शर्टाला धरून ढकलाढकली केली.
एवढ्यावरच न थांबता त्या दोघांना ढकलून देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला व टेम्पो घेऊन निघून गेला. याबाबत विनय भारत अटक यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी बजरंग ऊर्फ बापू लेंडवे व नवाज अकबर खतीब-मुलाणी या दोघांवर भादंवि कलम ३५३ अन्वये शासकीय कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.