शासकीय कामात अडथळा; दोघा बंधूंवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST2020-12-30T04:29:13+5:302020-12-30T04:29:13+5:30
आलेगाव येथील वीज वितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ मनोहर अंकुश इंगवले यांना गावातील अभिषेक कल्याण बाबर व सोमनाथ कल्याण बाबर हे ...

शासकीय कामात अडथळा; दोघा बंधूंवर गुन्हा दाखल
आलेगाव येथील वीज वितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ मनोहर अंकुश इंगवले यांना गावातील अभिषेक कल्याण बाबर व सोमनाथ कल्याण बाबर हे दोन बंधू चोरून लाईट वापरतात, अशी माहिती मिळाली होती. त्यांनी दोन दिवसांपूर्वी त्या दोघांना तारेवर आकडे टाकून चोरून लाईट वापरू नका, अशी ताकीद दिली होती. तरीही ते वापरतच होते. दरम्यान, २८ डिसेंबर रोजी मनोहर इंगवले व कंत्राटी कामगार दत्तात्रय माळी हे आलेगाव येथे लाईटच्या खांबावर आकडा टाकून चोरून लाईट कोणी वापरते का, याची पाहणी करीत असताना अभिषेक बाबर व सोमनाथ बाबर यांच्या घराजवळील खांबावर आकडा टाकलेला दिसला. त्यांनी सदरचा आकडा काढला असता अभिषेक बाबर व सोमनाथ बाबर यांनी आकडा का काढला, म्हणून दमदाटी करू लागले. तसेच तू गावात नोकरी कशी करतो तेच बघतो, अशी धमकी दिली. याबाबत वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ मनोहर इंगवले (रा. वाढेगाव) यांनी अभिषेक बाबर व सोमनाथ बाबर यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.