आता सोलापूर महापालिका शाळेतील मुलं चालत नव्हे सायकलवर येणार
By Appasaheb.patil | Updated: March 9, 2023 14:37 IST2023-03-09T14:37:06+5:302023-03-09T14:37:29+5:30
उद्योजक, बँकांच्या मदतीने शहरातील महापालिका शाळेत मोफत सायकलीचे वाटप

आता सोलापूर महापालिका शाळेतील मुलं चालत नव्हे सायकलवर येणार
सोलापूर - शहराच्या विविध भागांतून महापालिका शाळेत शिकणाऱ्या मुलींच्या वाहतुकीचा प्रश्न कायमचा मिटावा, यासाठी महापालिकेने विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप केले. त्यामुळे आता शक्यतो चालत येणारे मुलं नक्कीच सायकलवर येतील असा विश्वास आयुक्त शितल तेली-उगले यांनी व्यक्त केला.
शहरातील महापालिका शाळेतील पटसंख्या वाढावी, मुलींना शाळेत येताना होणारी वाहतूकीची अडचण दूर व्हावी यासाठी महापालिकेने सीएसआर फंडाच्या माध्यमातून बँका, उद्योजकांची मदत घेत सायकली मिळविल्या. या सायकलीचे वाटप नुकतेच कॅम्प शाळेत खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. सोलापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभाग व महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सायकली आठवी व नववीत शिकणाऱ्या मुलींना या सायकल ली देण्यात आल्या.
बजेटमध्ये सायकलींची तरतूद
महिला व बालकल्याण विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीच्या माध्यमातून दरवर्षी महापालिका शाळेतील मुलींना सायकलीचे वाटप करण्यात येणार आहे. हा उपक्रम महिला व बालकल्याण समितीच्यावतीने राबविण्यात येणार आहे.