वृध्दांसाठी आता आधुनिक डोली...
By Admin | Updated: November 23, 2014 23:43 IST2014-11-23T22:03:49+5:302014-11-23T23:43:58+5:30
आनंद ओक : सुटसुटीत अन् कमी खर्चात रुग्णालयापर्यंत पोहोचा...

वृध्दांसाठी आता आधुनिक डोली...
चिपळूण : येथील निवृत्त शिक्षक आनंद ओक यांनी आजारी किंंवा वयोवृद्ध व्यक्तिंच्या चलनवलनासाठी वेगळ्या पण सुटसुटीत पद्धतीची आधुनिक डोली तयार केली आहे.
वयोवृद्ध लोकांसाठी ही आधुनिक डोली म्हणजे म्हतारपणाचा आधार आहे. पूर्वी श्रीमंत व्यक्ती किंवा राजघराण्यातील व्यक्तिंसाठी डोलीचा उपयोग केला जात असे. मात्र, हीच डोली सर्वसामान्य लोकांसाठी उपयोगात आणण्याची कल्पना ओक यांनी प्रत्यक्षात उतरविली आहे. ओक हे शहरातील तुळशी अपार्टमेंट येथे राहतात. तेथे त्यांनी आपल्या ८३ वर्षांच्या आई श्रीमती मंदाकिनी यांच्यासाठी प्रथम ही डोली तयार केली. आजारी किंवा वृद्ध व्यक्तिला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ती फायदेशीर आहे. आपल्या आईसाठी डोली तयार करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्या डोलीचा प्रचार करण्यासाठी ओक यांनी प्ुढाकार घेतला आहे. यापुढे ते आधुनिक डोली तयार करण्याबाबत लोकांना मोफत मार्गदर्शन करणार आहेत. दोन बांबूच्या काठ्या आणि एका खुर्चीने त्यानी ही आधुनिक डोली तयार केली आहे.
या आधुनिक डोलीचे फायदे सांगताना ओक म्हणाले, आधुनिक खुर्ची अतिशय सुलभ आणि अखर्चिक आहे. दोन व्यक्ती या डोलीने आजारी किंवा वयोवृद्ध व्यक्तिला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज घेऊन जाऊ शकतात. वापरानंतर ती सोडून ठेवणे सहज शक्य आहे. कमी रुंदीच्या ठिकाणी प्रवास करतानाही या डोलीचा उपयोग होतो. ज्या व्यक्तिला बसवायचे आहे. त्याचे वजन बघूनच डोळी तयार करावी लागेल. समाजातील सर्व स्तरातील लोक या डोलीचा वापर करू शकतात. एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी ही आधुनिक डोली तातडीने तयार करून रुग्णांना मदत करता येईल. युनायटेड इंग्लिश स्कूलच्या शेजारी असलेल्या तुळसी अपार्टमेटमध्ये ते लोकांना आधुनिक डोली तयार करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. (प्रतिनिधी)