तलावाशेजारील कुटुंबांना नोटिसा द्या

By Admin | Updated: July 11, 2014 01:49 IST2014-07-11T01:49:29+5:302014-07-11T01:49:29+5:30

जिल्हाधिकारी : सिद्धेश्वर तलाव सुधार समितीची बैठक

Notices to families near pond | तलावाशेजारील कुटुंबांना नोटिसा द्या

तलावाशेजारील कुटुंबांना नोटिसा द्या


सोलापूर: सिद्धेश्वर तलावाशेजारील कुटुंबांकडून तलावात घाण पाणी सोडले जात आहे, यामुळे तलाव प्रदूषित होत असल्याची तक्रार सिद्धेश्वर देवस्थान समितीकडून करण्यात आल्यामुळे याबाबत तलावाशेजारील ४३ कुटुंबांना नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकारी तथा सिद्धेश्वर तलाव सुधार समितीचे अध्यक्ष डॉ़ प्रवीण गेडाम यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले़
केंद्राच्या निधीतून सिद्धेश्वर तलाव सुधारण्यासाठी निधी मिळाला आहे़ तलाव सुधार समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असून, कामांचा आढावा आणि इतर काही बाबींबद्दल गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती़ यावेळी देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी, इस्टेट सेक्रेटरी गुंडप्पा कारभारी, मनपाचे नगर अभियंता जी़एम़ दुलंगे आदी उपस्थित होते़ तलावात घाण पाणी येत असल्यामुळे त्यावर उपाययोजना व्हावी, अशी मागणी कारभारी यांनी केली़ मनपाकडून नोटिसा देऊन शेजारी राहणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नगर अभियंता दुलंगे यांना दिले़ पठाण बागेजवळील शासकीय जागेवर तलाव सुधार योजनेंतर्गत फिल्टरेशन प्लँट बसविण्याचे नियोजन असून, त्या जागेवर अतिक्रमण झाले आहे, त्यामुळे संबंधित तहसीलदारांकडून नोटिसा पाठवून अतिक्रमण काढण्याची कारवाई करावी, असेही निर्देश गेडाम यांनी दिले़ तलाव सुधारण्याबद्दल तसेच केंद्राच्या निधीतून टूरिझम सर्किट करण्याच्या नियोजनासाठी पुन्हा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली आहे़

Web Title: Notices to families near pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.