'उत्तर'मध्य देशमुख विरोधक सक्रिय
By Admin | Updated: September 23, 2014 14:22 IST2014-09-23T14:22:08+5:302014-09-23T14:22:08+5:30
भाजपचे शहर उत्तरमधील विद्यमान आ. विजयकुमार देशमुख यांनी भाजपच्या नगरसेवकांमध्ये भांडणे लावली.

'उत्तर'मध्य देशमुख विरोधक सक्रिय
>सोलापूर : भाजपचे शहर उत्तरमधील विद्यमान आ. विजयकुमार देशमुख यांनी भाजपच्या नगरसेवकांमध्ये भांडणे लावली. पक्ष वाढविण्याऐवजी शहर उत्तर पुरताच पक्ष र्मयादित ठेवला त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य कोणालाही उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणी आमदार विरोधी गटाने अथर्व गार्डनमधील मेळाव्यात केली. यावेळी देशमुखांवर अनेक आरोप करण्यात आले.
भाजपमध्ये गेल्या दीड ते दोन वर्षांपासून दोन गट पडले असून एका गटाने आ. देशमुखांना थेट विरोध सुरू केला आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या मेळाव्यात नगरसेवक सुरेश पाटील, जगदीश पाटील, मोहिनी पतकी, श्रीकांचना यन्नम, रोहिणी तडवळकर, नरसूबाई गदवालकर, नागेश वल्याळ, पांडुरंग दिड्डी, सुरेखा अंजीखाने या विद्यमान नगरसेवकांसह भाजपचे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, राम तडवळकर, देवानंद अंजीखाने,बंडू कुलकर्णी, श्रीपाद घोडके, राजू हौशेट्टी, बाबुराज जमादार, प्रकाश पात्रे यांच्यासह सुमारे हजार कार्यकर्ते उपस्थित होते.
शहर उत्तर मतदारसंघातून नागेश वल्याळ, जगदीश पाटील, सुरेश पाटील, मोहिनी पतकी, रोहिणी तडवळकर आदींसह १८ जणांनी लढण्याची इच्छा यावेळी व्यक्त केली. या १८ मधून सुरेश पाटील यांना उमेदवारी द्यावी आणि तेही नको असतील तर सुभाष देशमुख, विवेक घळसासी, किशोर देशपांडे यांच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्यावी आम्ही पक्षाचे काम प्रामाणिकपणे करु असे यावेळी अनेकांनी भाषणात सांगितले.
आ. देशमुखांनी सुरेश पाटील-हिरेमठ, नागेश वल्याळ- राजू पाटील, शिवानंद पाटील- श्रीकांचना यन्नम, संजय कोळी- गदवालकर यांच्यात भांडणे लावली. पदाधिकार्यांची दोन वर्षांपासून निवड केली नाही. अपक्ष, भाजप, शिवसेना, काँग्रेस, जनसुराज्य आदी अनेक पक्षातून आलेल्या बाळू पाटील यांना पुन्हा पक्षात घेतले अशी टीका सुरेश पाटील यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी)
पक्ष विकल्याची टीका
■ विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दीपक साळुंखे यांच्याशी आर्थिक व्यवहार करून प्रत्येक नगरसेवकांना ५ लाख मिळवून दिले. यातील २ लाख नगरसेवकांना दिले तर उर्वरित ३0 लाख रुपये जनता बँकेत 'एफडी' करून ठेवले आहेत. असा व्यवहार केल्यामुळे भाजपचे त्यावेळचे उमेदवार रामचंद्र जन्नू यांना अवघी ४ मते पडली हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे अशा आ. देशमुखांना पुन्हा उमेदवारी देऊ नये अशी मागणी यावेळी नगरसेवक जगदीश पाटील यांनी केली.