तलाठी नको.. तहसीलदार नको.. तुम्हीच नोंदवा वावरातील पीकपेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:48 IST2021-09-02T04:48:08+5:302021-09-02T04:48:08+5:30
सोमवारी दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार यांनी तालुक्यातील तलाठी, मंडल अधिकारी यांची बैठक घेऊन ई - पीक पाहणी मोहिमेला ...

तलाठी नको.. तहसीलदार नको.. तुम्हीच नोंदवा वावरातील पीकपेरा
सोमवारी दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार यांनी तालुक्यातील तलाठी, मंडल अधिकारी यांची बैठक घेऊन ई - पीक पाहणी मोहिमेला गती देण्यासाठी जनजागृती अभियान राबवण्याचं आवाहन केलं. त्यानुसार महसूल यंत्रणा झाडून कामाला लागली. गावोगावी जाऊन बैठका घेतल्या. शेतावर जाऊन शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करण्याची माहिती दिली.
------
कशी करावी नोंदणी
प्ले स्टोअरमधून ई-पीक पाहणी हे ॲप डाउनलोड करावे लागेल त्यात स्वतःची माहिती उदा. नाव, आडनाव इत्यादी भरावी, ज्या मोबाईलवर ॲप डाऊनलोड करायचे आहे तो क्रमांक टाकल्यास ओटीपी येईल. त्यावर लॉगिन करून त्यात आपल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक नोंदवावा. त्यात शेतातील पीक, झाडे, विहीर, पडीक जमीन आदींबाबत माहिती भरता येईल. त्याच ॲपमधून कॅमेरा ओपन करायचा शेताच्यामध्ये उभा राहून पिकांचा फोटो घ्यायचा आणि हा फोटो अपलोड केल्यानंतर नोंदणी पूर्ण होणार आहे. ही माहिती तलाठ्यांच्या लॉगिन वर दिसताच ते मान्यता देतील.
----
सामायिक खातेदारांसाठी
एकाच गट नंबरमध्ये अनेक खातेदारांची नावे असतात. त्यांची वाटणी अथवा खातेफोड झाली नसेल तर त्यांना सामायिक खातेदार संबोधले जाते. या सामायिक खातेदारांना स्वतंत्र नोंदी व त्यांच्या पिकांचे फोटो अपलोड करता येईल.
-----
धोत्री गाव आघाडीवर
दक्षिण सोलापूर तालुक्यात ८४,९०२ सर्व्हे क्रमांक आहेत. १५ ऑगस्टपासून ई - पीक पाहणी नोंदणीची मोहीम सुरू झाली. ३१ ऑगस्टअखेर तालुक्यातून केवळ १४४५ खातेदारांनी ई पीक पाहणी ॲपवर नोंदणी केली आहे. त्यातही १३२३ खातेदार सक्रिय आहेत. त्यांनी संपूर्ण पीक पाण्याच्या नोंदी अद्ययावत केल्या आहेत तर १२२ खातेदारांनी केवळ रजिस्ट्रेशन केले. धोत्री (१०८), माळकवठे (८०), कंदलगांव (६५) ही गावे आघाडीवर आहेत.
-----
सध्या महसूल खाते ही मोहीम राबवत असून कृषी खात्याची मदत मिळाल्यास अधिक गती येईल. ई पीक पाहणी नोंदणी अभियान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून पद्धत अत्यंत सोपी आहे. प्रत्येक खातेदारांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. शासकीय योजना, नैसर्गिक आपत्ती, विमा यांसाठी त्याचा उपयोग होणार आहे.
- अमोल कुंभार, तहसीलदार, दक्षिण सोलापूर तहसील
----