‘त्या’ बाळाच्या पोटात आढळला नाही प्लास्टिकचा तुकडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:46 IST2021-02-05T06:46:11+5:302021-02-05T06:46:11+5:30
भाळवणी ( ता. पंढरपूर) येथील माधुरी व त्यांचे पती बाबा बुरांडे हे आपल्या एक वर्षाच्या बाळाला पोलिओ लस देण्यासाठी ...

‘त्या’ बाळाच्या पोटात आढळला नाही प्लास्टिकचा तुकडा
भाळवणी ( ता. पंढरपूर) येथील माधुरी व त्यांचे पती बाबा बुरांडे हे आपल्या एक वर्षाच्या बाळाला पोलिओ लस देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले होते. वैद्यकीय केंद्रातील एक महिला बुरांडे यांच्या लहान बाळाच्या तोंडात लस टाकत होती. याच दरम्यान ड्रॉपचे टोपण ( प्लास्टिकचा लहान तुकडा) ही बाळाच्या तोंडात गेला. हा प्रकार वैद्यकीय अधिकारी ए. डी. रेपाळ यांच्या समोर घडला. घरी गेल्यानंतर बाळाला त्रास सुरू झाला.
त्यानंतर माधुरी बुरांडे यांनी बाळाला डॉक्टरांकडे नेले. त्यानंतर बाळाची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर बाळाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्याची आरोग्य तपासणी केली असता प्लास्टिकचा तुकडा पोटात आढळून आला नाही. कदाचित तो प्लास्टिकचा तुकडा बाळाच्या पोटातून शौचावाटे बाहेर पडला असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर बाळाची पुन्हा बुधवारी देखील तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉ. रेपाळ यांनी सांगितले.
----