भाडेपट्टा करार संपूनही जमीन नाही मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:46 IST2021-02-05T06:46:00+5:302021-02-05T06:46:00+5:30
करमाळा : आठ एकर शेतजमिनीचा भाडेपट्टा कराराची २५ वर्षांची मुदत संपूनही जमीन परत मिळत नसल्याने करमाळा तालुक्यातील भिवरवाडी-वांगी येथील ...

भाडेपट्टा करार संपूनही जमीन नाही मिळाली
करमाळा : आठ एकर शेतजमिनीचा भाडेपट्टा कराराची २५ वर्षांची मुदत संपूनही जमीन परत मिळत नसल्याने करमाळा तालुक्यातील भिवरवाडी-वांगी येथील मुबारक महिबूब मुलाणी (वय-७०) या वृद्धाने विष प्राशन करून आत्महत्या केली. बुधवारच्या रात्री ही दुर्दैवी घटना घडली. दोषींवर गुन्हा नोंदविण्यासाठी गुरुवारी करमाळा पोलीस ठाण्यासमोर प्रेत ठेऊन आंदोलन करताच तिघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी मुबारक मुलाणी या शेतकऱ्याने स्व:हस्ताक्षरात चिठ्ठी लिहून भिवरवाडीमधील तिघा अरकिले बंधूंना जबाबदार धरले आहे. मुबारक महिबूब मुलाणी यांनी २५ जानेवारी रोजी दुपारी तननाशक औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात त्याच दिवशी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान २७ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या कडे खिशात चिठ्ठी आढळून आली.
काय म्हटलेय चिठ्ठीत
भिवरवाडी-वांगी, ता.करमाळा येथील मुबारक महिबूब मुलाणी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, माझ्याकडून जबरदस्तीने सर्व्हे नं.४३६ ही जमीन भाडेपट्ट्यावर सही करून घेतली व न केल्यास तुला आम्ही शेती करू देणार नाही. तू चार एकर शेती कर व आम्हाला चार एकर दे असे म्हणून मला पाच-दहा हजारांप्रमाणे ५९ हजार रुपये दिले. दत्तात्रय अरकिले याचा हस्तलिखित हिशोब आहे. त्यातील चार एकर जमीन मी स्वत:वहिवाटीत होतो. उताऱ्यावर बँक लोन व बोअरची नोंद आहे. माझ्या मृत्यूस मल्हारी कृष्णा अरकिले, नारायण कृष्णा अरकिले व दत्तात्रय कृष्णा अरकिले जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
अन् पोलिसांनी घेतली दखल
सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलाणी यांच्या शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी दुपारी करमाळा पोलीस ठाण्यासमोर त्यांचे प्रेत आणून अरकिले बंधूंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी मयताचा मुलगा शब्बीर मुबारक मुलाणी याच्या फिर्यादीवरून मल्हारी कृष्णा अरकिले,नारायण कृष्णा अरकिले व दत्तात्रय कृष्णा अरकिले (तिघे रा. भिवरवाडी) यांच्या विरोधात भादवि ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास फौजदार सुनील जाधव करीत आहेत.
फोटो: २८करमाळा
आत्महत्याग्रस्त मुबारक मुलाणी याचे प्रेत असलेली रुग्णवाहिका करमाळा पोलीस ठाण्यासमोर उभी करण्यात आली.
२८मुबारक मुलाणी