सांगोला : चिठ्ठी लिहून नऊ महिन्यांच्या गरोदर मातेने फेट्याच्या साह्याने घरातील लोखंडी पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास सांगोला तालुक्यातील गायगव्हाण येथील टकले वस्ती येथे घडली. रुक्मिणी सूरज टकले असं मृत गरोदर मातेचे नाव आहे. याबाबत पती सुरज सीताराम टकले यांनी पोलिसांत माहिती दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुक्मिणी यांचा १७ मार्च २०२४ रोजी गायगव्हाण येथील सुरज टकले याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर रुक्मिणी सासरी नांदत असताना ९ महिन्यांची गरोदर माता होती. डॉक्टरांनी येत्या २९ एप्रिल रोजी प्रसूतीची तारीख दिली होती. दरम्यान, रविवारी रुक्मिणी हिने मला माफ करा, माझ्यात कोणताच चांगला गुण नाही अशी चिठ्ठी लिहून ठेवली आणि दुपारी ३ च्या सुमारास राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला लाल रंगाच्या फेट्याने गळफास घेतला.
दरम्यान, घरातील नातेवाइकांनी तिला जेवण्यासाठी बेडरुमचा दरवाजा ठोठावला असता आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून दीर स्वप्नील टकले यांनी खिडकीची काच फोडून आत पाहिले असता वहिनी रुक्मिणीने गळफास घेतल्याचे दिसले. या घटनेची माहिती माहेरी रुक्मिणीचा भाऊ अमोल माने, पोलिस पाटील विद्या कांबळे व तिचा नवरा सुरज टकले याला दिली. सांगोला ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा मृत रुक्मिणीचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला.