धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य कदापि करू नका

By Admin | Updated: July 30, 2014 01:28 IST2014-07-30T01:28:47+5:302014-07-30T01:28:47+5:30

रमजान ईद उत्साहात : शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली यांचा संदेश

Never do such an act that hurt religious sentiments | धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य कदापि करू नका

धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य कदापि करू नका


सोलापूर : लोकांच्या मनात आपल्याबद्दल घृणा निर्माण होईल असे वागू नका, सोशल साईटचा गैरमार्गाने वापर करून कोणाच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पोस्ट करू नका, संघटित राहा, असा संदेश शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली यांनी ईदनिमित्त उपस्थित जनसमुदायाला दिला़
होटगी रोडवरील ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांनी ‘रमजान ईद’निमित्त मंगळवारी सकाळी सार्वजनिक नमाज अदा केली़ याप्रसंगी जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी जनतेला वरील संदेश दिला़ पानगल हायस्कूल, रंगभवन मैदान, आसार मैदान, होटगी रोड आणि जुनी मिल कंपाउंड अशा पाचही ठिकाणी सार्वजनिक नमाज पठण झाले़
होटगी रोडवरील ईदगाह मैदानावर सकाळी ९़३० वाजता शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली यांच्या प्रमुख उपस्थितीत नमाज पठण झाले़ यावेळी त्यांनी जगातील शांतता, सुव्यवस्थेला बाधा आणण्याचे कार्य सुरू असल्याची खंत संदेशातून व्यक्त करीत इराकमध्ये गाझापट्ट्यात जो नरसंहार सुरू आहे तो मानवजातीला काळिमा फासणारा असल्याचे म्हणाले़ बेकसूर नागरिकांचा खून यामध्ये होता कामा नये़ महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कायम शांततेचा संदेश दिला आहे़ यापुढची पिढी शिकून, सुसंस्कृत व्हावी, इस्लाम धर्मातील प्रथेप्रमाणे जकात देऊन गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देता येते काय यासाठी प्रयत्नशील राहा, असाही काझी यांनी संदेश दिला़
सकाळी ९ वाजल्यापासून विविध ईदगाह मैदानांवर मुस्लीम बांधव जमू लागले़ पांढऱ्या कपड्यात, अत्तराचा सुगंध दरवळत एकमेकाला गळा भेट घेत महिनाभराच्या उपवासाचा समारोप केला़ लहान मुलेदेखील वडीलधाऱ्या माणसांसोबत ईदगाह मैदानावर हजेरी लावून नमाज अदा केली़
या ईदगाह मैदान परिसरात वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता़ तसेच या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता़ पोलीस आयुक्तालयाच्या वतीने राज्य कामगार विमा हॉस्पिटलच्या वळणावर उभारलेल्या मंडपात पोलिसांच्या हस्ते गुलाबाची फुले देऊन मुस्लीम बांधवांचे स्वागत केले गेले़ चौकाचौकातील गर्दी पोलीस कमी करीत होते़ बहुसंख्य मुस्लीम बांधवांनी दुकान-व्यवसाय बंद ठेवून ईदचा सण साजरा केला़ पानगल हायस्कूलच्या मैदानावर सार्वजनिक नमाज अदा करण्यात आली़ यावेळी शहर काझी अ‍ॅड़ अब्बासअली काझी यांनी शहरवासीयांना शांततेचा संदेश दिला़
-----------------------------------------
शुभेच्छा अन् शिरकुर्मा़़़
सार्वजनिकरित्या नमाज पठणानंतर दिवसभर घरोघरी शिरकुर्मा देऊन मित्र, नातेवाईकांचे तोंड गोड करण्याचे कार्य सुरू होते़ घरोघरी आनंदाचे वातावरण दिसून येत होते़ काही नागरिकांनी आजच्या सणाचे औचित्य साधून दानधर्म करुन मानवतेचा धर्म जोपासला़ तसेच शहरात ठिकठिकाणी राजकीय पक्ष, संघटना आणि गल्लीतील मंडळींनी रस्त्याच्या कडेला, चौकाचौकात जाहिरातींच्या पोस्टरवर कार्यकर्त्यांबरोबर नेतेमंडळींची छायाचित्रे झळकवली़
 

Web Title: Never do such an act that hurt religious sentiments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.