चौरंगी लढतीचा राष्ट्रवादीला फायदा
By Admin | Updated: October 22, 2014 14:48 IST2014-10-22T14:48:15+5:302014-10-22T14:48:15+5:30
एकगठ्ठा मतांच्या जोरावर राष्ट्रवादीला विजय खेचून आणण्यात यश आले असले तरी सेना, भाजप आणि अपक्ष या विरोधकांच्या मतांची बेरीज पाहता भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मचिंतन करावे लागेल.

चौरंगी लढतीचा राष्ट्रवादीला फायदा
>एकगठ्ठा मतांचा फायदा
मोहोळ मतदारसंघात मिळालेली मते
अशोक कांबळे ■ मोहोळ
मतदारसंघात झालेल्या चौरंगी लढतीचा राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा झाला. एका विभागाच्या एकगठ्ठा मतांच्या जोरावर राष्ट्रवादीला विजय खेचून आणण्यात यश आले असले तरी सेना, भाजप आणि अपक्ष या विरोधकांच्या मतांची बेरीज पाहता भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मचिंतन करावे लागणार आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कदम यांनी ६२ हजार १२0 मते घेत आठ हजारांची आघाडी घेऊन विजय मिळवला. मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची नगण्य ताकद असताना ऐनवेळी भाजपात प्रवेश केलेले संजय क्षीरसागर हे वैयक्तिक ताकदीच्या जोरावर ५३,७५३ मते मिळवत दुसर्या क्रमांकावर राहिले. सेनेने सोलापूरचे नगरसेवक मनोज शेजवाल यांना उमेदवारी दिली होती. अल्पावधीत मतदारसंघात आपली छाप पाडून ४२,४७८ मते मिळवली. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार लक्ष्मण ढोबळे यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष उमेदवारी दाखल करीत निवडणुकीत रंगत आणली होती. परंतु मतदारांनी त्यांना नाकारल्याचे त्यांच्या मतांच्या आकडेवारीवरून दिसते. त्यांना केवळ १२ हजार मतांवर समाधान मानावे लागले.
मोहोळ विधानसभा मतदारसंघावर गेली २५ वर्षे माजी आमदार राजन पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांचे वर्चस्व आहे. गत निवडणुकीत हा मतदारसंघ राखीव झाल्यावर लक्ष्मण ढोबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. ढोबळे गत निवडणुकीत सुमारे ३८ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते. पाच वर्षांच्या काळात बरीच विकासकामे झाली होती. परंतु राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी नाकारत अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांना उमेदवारी दिली. बाहेरचा उमेदवार, त्यात ढोबळे यांची अपक्ष उमेदवारी यामुळे राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे होते. मोहोळ तालुक्यातील मतदारांनी पुन्हा या दोन्ही नेत्यांवर विश्वास टाकत राष्ट्रवादीच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले.
विरोधी पक्षात सेनेची उमेदवारी क्षीरसागर परिवारास मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ऐनवेळी सेनेने शेजवाल यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या संजय क्षीरसागर यांनी एका दिवसात भाजपची उमेदवारी पदरात पाडून घेतली. सेना आणि भाजपचे दोन मातब्बर उमेदवार रिंगणात उतरल्याने मतांचे विभाजन होऊन राष्ट्रवादीचा फायदा होणार हे गृहीत होते. परंतु आमदार ढोबळे यांनी राष्ट्रवादीच्या मतात विभाजन करून आपला फायदा होईल, अशी अपेक्षा या दोन्ही उमेदवारांना होती, मात्र अपक्ष उमेदवारांना डावलल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला.
राष्ट्रवादीचा उमेदवार जरी विजयी झाला असला तरी भाजपाचे संजय क्षीरसागर यांना मिळालेली ५३७५३ मते, सेनेचे शेजवाल यांना मिळालेली ४२४७८ मते, अपक्ष ढोबळे यांना मिळालेली १२0१४ मते या सर्वांची बेरीज पाहता राष्ट्रवादीच्या विरोधात गेलेली १ लाख ८ हजार मते भविष्यात राष्ट्रवादीला आत्मचिंतन करायला लावणारी आहेत.
मोहोळ मतदारसंघात असणार्या उत्तर सोलापूर व पंढरपूर तालुक्यातील मतांची आकडेवारी पाहता राष्ट्रवादीला या दोन्ही भागात अगदी कमी मते मिळालेली आहेत. या गोष्टीचाही राष्ट्रवादीला विचार करावा लागणार आहे. एकगठ्ठा मतांचा फायदा
■ या निवडणुकीत जातीय रंग दिसून आला. मुद्यावरची निवडणूक वैयक्तिक हेव्यादाव्यावर गेली. सेना आणि भाजपाच्या दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघात जवळपास बरोबरीने मते घेत आघाडी घेतली. या दोघांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मतांचे विभाजन झाले. पारंपरिक अनगर व शेटफळच्या गठ्ठा मतांचा फायदा राष्ट्रवादीला झाला.