राष्ट्रवादीही आता उतरणार मैदानात; पक्ष संघटनेसाठी सोलापूरची जबाबदारी अजित पवारांवर
By Appasaheb.patil | Updated: August 19, 2023 13:22 IST2023-08-19T13:22:03+5:302023-08-19T13:22:19+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) गटाने आता पक्षसंघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

राष्ट्रवादीही आता उतरणार मैदानात; पक्ष संघटनेसाठी सोलापूरची जबाबदारी अजित पवारांवर
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) गटाने आता पक्षसंघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी मंत्रीनिहाय जिल्ह्याची जबाबदारीचे पत्र प्रसिध्दीला दिले आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात शरद पवार व अजित पवार गट हे वेगवेगळे झाले असून अजित पवार गटाने आता राज्यात पक्षसंघटनेवाढीसाठी ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अजित पवार गटाचे मंत्री हे प्रत्यक्ष जावून सभा, कार्यकर्त्यांशी संवाद, मतदारांशी संवाद, शासनाच्या योजनांचा प्रचार, प्रसार व पक्षसंघटना वाढीसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करणार असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर राज्यातील ३६ जिल्हयांची पक्ष संघटना वाढीकरीता जबाबदारी सोपवण्यात आल्याचेही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोशल मिडियावरून सांगितले आहे.
असे आहेत राज्यातील अजित पवार गटाचे मंत्री अन्य जबाबदारी दिलेली जिल्हे..
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुणे, सातारा, सांगली व सोलापूर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, व नागपूर, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर, मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा, हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर, सिंधुदूर्ग, व अहमदनगर, मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बीड, परभणी, नांदेड, व जालना, मंत्री संजय बनसोडे यांच्यावर हिंगोली,लातूर, व उस्मानाबाद, मंत्री अदिती तटकरे यांच्यावर रायगड, रत्नागिरी, ठाणे, व पालघर, अनिल पाटील यांच्यावर जळगाव, धुळे, व नंदुरबार, मंत्री धर्मारावबाबा आत्राम यांच्यावर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्हयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.