पंढरपूर तालुक्यातील एमआयडीसीसाठी राष्ट्रवादी आग्रही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:26 IST2021-09-14T04:26:22+5:302021-09-14T04:26:22+5:30
युती शासनाच्या काळात दिवंगत वसंतराव काळे यांनी पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी उभारणीसाठी पंढरपूरमध्ये कॅबिनेट बैठक लावून हा विषय लावून धरला ...

पंढरपूर तालुक्यातील एमआयडीसीसाठी राष्ट्रवादी आग्रही
युती शासनाच्या काळात दिवंगत वसंतराव काळे यांनी पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी उभारणीसाठी पंढरपूरमध्ये कॅबिनेट बैठक लावून हा विषय लावून धरला होता. नंतर दिवंगत आ. भारत भालके यांच्या काळातही यासंदर्भात मोठे प्रयत्न झाले. यानंतर राष्ट्रवादी उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्षपद घेतलेल्या नागेश फाटे यांनी प्रयत्न सुरू केले असल्याचे दिसत आहे. या संदर्भात नुकतीच राज्याचे उद्योगमंत्री आदिती तटकरे यांची त्यांनी भेट घेतली आहे. याबरोबरच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडेही याबाबत आग्रह धरला आहे.
पंढरपूर तालुक्यात मोठा शैक्षणिक विकास झाल्याने, अनेक तरुण सुशिक्षित बनले आहेत. वाढत्या बेरोजगारीमुळे त्यांना कामधंद्यासाठी शहरी भागाकडे जावे लागत आहे. पुणे-मुंबई येथील सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. पंढरपूर तालुक्यात बेरोजगारीचे मोठे प्रमाण आहे. यासाठी अनेक दिवसांपासून चर्चेत असणारी एमआयडीसी मंजूर झाल्यास येथील युवकांना रोजगाराची संधी निर्माण होणार असल्याचे त्यांनी उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.
प्रयत्न तडीस नेणार..
राष्ट्रवादी उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी पंढरपूर तालुक्यात, एमआयडीसी उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे प्रयत्न तडीस नेणार असल्याची प्रतिक्रिया नागेश फाटे यांनी दिली.
फोटो लाईन ::::::::::::::::::
पंढरपूर तालुक्यात एमआयडीसी व्हावी, यासंदर्भात उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देऊन चर्चा करताना प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, पालकमंत्री दत्ता भरणे, कल्याण कुसुमडे आदी.