माढ्यात युती तुटल्याने ‘महायुती’धोक्यात
By Admin | Updated: January 31, 2017 17:31 IST2017-01-31T17:31:31+5:302017-01-31T17:31:31+5:30
माढ्यात युती तुटल्याने ‘महायुती’धोक्यात

माढ्यात युती तुटल्याने ‘महायुती’धोक्यात
माढ्यात युती तुटल्याने ‘महायुती’धोक्यात
कुर्डूवाडी : आॅनलाईन लोकमत
मुंबईत भाजपा-शिवसेनेची युती तुटल्याने माढा तालुक्यात आ. बबनराव शिंदे यांच्या विरोधात ‘महायुती’ करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेला वेगळी चूल मांडण्याचे आदेश पक्षाकडून मिळाले आहेत.
माढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा फिवर सध्या गावोगावी वाढत असून ज्यांना नेत्यांनी कानमंत्र दिला आहे, त्या इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात गाठीभेटी वाढविल्या आहेत; मात्र व ज्या इच्छुकांना उमेदवारीची खात्री नाही त्यांनी कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवत नेत्यांजवळ फिल्डिंग सुरू ठेवली आहे.
सर्वच वरिष्ठ नेते आपला कार्यकर्ता इतर पक्षात जाऊ नये यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच पत्ते उघडण्याची शक्यता आहे. त्यातच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण पुरुष असल्याने निवडणुकीला रंगत आली आहे. आ.शिंदे बंधू विरोधात सर्वपक्षीय महायुती असे एकंदर चित्र रंगले होते; मात्र शिवसेना व भाजपा या पक्षांचा मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काडीमोड झाला त्याचे पडसाद माढा तालुक्यात उमटतात का याची उत्सुकता लागली आहे. पक्षीय आदेश म्हणून शिवसेनेची वेगळी चूल मांडण्यात येणार आहे त्याबाबत जिल्हास्तरीय नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहेत.
भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांनी पुढाकार घेत सर्व विरोधकांना एकत्र करून मोट बांधण्याच्या कामात आघाडी घेतली होती; मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने माढा तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आ.धनाजीराव साठे, शिवसेना नेते प्रा. शिवाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब साठे, जि.प.चे माजी सभापती संजय पाटील भीमानगरकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील घाटणेकर, विजय शुगरचे संचालक भारत पाटील, तालुका पंचायत समितीचे सदस्य भारत शिंदे यांनी एकत्र चर्चा केली पण भूमिका मात्र गुलदस्त्यात ठेवली आहे; मात्र हे नेते एकास एक उमेदवार देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, मानेगाव गटातील उमेदवारीवर महायुतीचे भवितव्य अवलंबून आहे.
शिवसेनेचे संपर्कमंत्री खा. राहुल शेवाळे, शिवसेना उपनेते आ.तानाजीराव सावंत हे जो आदेश देतील तो आम्ही पाळू, असे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी सांगितले. काँग्रेस पक्षानेही सध्या ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे; मात्र वरिष्ठ पातळीवरुन राष्ट्रवादीशी आघाडी झाल्यास रणनीतीत बदल करावा लागणार आहे.
------------------------
काही जागांचा तिढा कायम
आ. बबनराव शिंदे यांनी कारखान्यावर प्रत्येक गावातील नेत्यांना बोलावून त्यांचे मत जाणून घेतले. त्यानंतर काही उमेदवार फायनल केले; मात्र काही जागांचा तिढा अजूनही कायमच आहे. एक नाव पुढे केले की, तो उमेदवार नको म्हणून सांगणारा वर्ग अचानकच पुढे येत असल्यामुळे सर्वांचा मेळ आ. शिंदे कसे घालतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.