आठ दिवस गोव्याच्या बीचवर मेंबर रमले; आता निवडीच्या प्रतिक्षेत घरात बसले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 01:09 PM2021-02-13T13:09:03+5:302021-02-13T13:09:09+5:30

माढा : सरपंच निवडीची तारीख अनिश्चित, सहलीला गेलेले सदस्य परतले

Members played on the beaches of Goa for eight days; Now sitting at home waiting for a choice! | आठ दिवस गोव्याच्या बीचवर मेंबर रमले; आता निवडीच्या प्रतिक्षेत घरात बसले !

आठ दिवस गोव्याच्या बीचवर मेंबर रमले; आता निवडीच्या प्रतिक्षेत घरात बसले !

googlenewsNext

कुर्डूवाडी : तब्बल आठ दिवस गोव्यातील बीचवर फिरून एन्जॉय तर केलाच, शिवाय गावच्या निवडणुकीतील किस्स्यांनी सर्वांचे मनोरंजन झाल्याचे गोव्यावरून आलेल्या सदस्याने नाव न सांगण्याच्या छापण्याच्या अटीवर लोकमतशी बोलताना सांगितले.

निवडणुकीनंतर सरपंच पदाच्या आरक्षणाच्या सोडतीनंतर निवडीच्या कार्यक्रमाच्या घोषणेची उत्सुकता गावोगावी लागली होती. प्रशासनाने येथील सरपंच निवडीचा कार्यक्रम ९, १२ व १३ फेब्रुवारी या तीन टप्या टप्याने जाहीर केला, परंतु काही गावचे सरपंच पदाचे आरक्षण चुकले म्हणून तक्रारी झाल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व निवडी स्थगित केल्याने अनेकांची गोची झाली. काही गावात सत्ताधारी गटाला काटावरचे बहुमत आहे, तर काही गावांत सत्ता प्रस्थापित होऊनही विरोधकांचा सरपंच होणार आहे. काहींनी गावपातळीवरील अनेक गट एकत्र करून गावची निवडणूक लढविली होती. आता गावच्या सरपंच निवडीलाच उशिर होत असल्याने यामध्ये विस्कळीतपणा निर्माण झाला आहे. आपला कारभारी कोण होणार आणि त्याला किती दिवस लागणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोव्याचे सौंदर्य पाहिले अन् प्रवासही केला
आमच्या गावची सरपंच पदाची निवड ही ९ फेब्रुवारी रोजी होती. म्हणून आमच्या पार्टी लीडरने निवडी अगोदरच पाच दिवसापूर्वीच आम्हा सर्व नूतन सदस्यांना व सरपंचपदाच्या इच्छुक दावेदाराला गोव्याला घेऊन सहलीचे नियोजन केले होते. तेथे आम्ही आठ दिवसांत दररोज एक बीच फिरायचो. काही शौकीन हे तेथील विविध प्रकारच्या कलाकेंद्रात आनंद घ्यायचे. गोव्याचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी सुध्दा आम्ही तेथे खूप प्रवासदेखील केला. समुद्र किनाऱ्यावर खूप आनंद लुटला. त्यामुळे पार्टी लीडरने आयोजन केलेल्या सहलीत आम्ही खूप एन्जॉय केला आहे. याबरोबरच गावच्या निवडणुकीतील विविध किस्से एकमेकांना दररोज सांगायचो आणि कोणाला कसं फसविले हे ऐकून खूप हसायचो. असे एका सदस्याने गोवाहून परतल्यानंतर नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतशी बोलताना सांगितले.

न्यायालयीन लढाई..
बेंबळेच्या निवडणुकी वार्ड क्र ३ व ४ ची प्रकिया ही बेकायदेशीर झाल्याची तक्रार माढा न्यायालयात दाखल झाली आहे. त्याची न्यायालयीन लढाई सुरु आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार दाखल आहे. तसेच उपळाई (बु) गावची ही निवडणुकीबाबत तक्रार दाखल झालेली आहे. येथे प्रभाग २ मधील बुथ क्र १ मधील निवडणुकीला उभा राहिलेल्या दादासाहेब नागटिळक गटाच्या पोपट लहू भांगे, मनीषा भारत वाकडे, आशा गणेश शितोळे या तिन्ही उमेदवारांनी मतदान यंत्रावर आक्षेप घेत माढा न्यायालय व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्याबाबतही माढा न्यायालयात खटला सुरु आहे. संबंधित तक्रारींचे निराकरण केल्याशिवाय गावची सरपंच निवड करु नये, असे तक्रारीत म्हटले आहे.
 

Web Title: Members played on the beaches of Goa for eight days; Now sitting at home waiting for a choice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.