'समीक्षा'साठी महापौरांचा दबाव

By Admin | Updated: September 2, 2014 16:40 IST2014-09-02T16:40:13+5:302014-09-02T16:40:13+5:30

शहरातील कचरा उचलण्याचा ठेका घेतलेल्या समीक्षा कंपनीला काम करण्याची संधी द्यावी म्हणून महापौर अलका राठोड यांनी घेतलेल्या बैठकीत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कारवाईवर ठाम असल्याचे ठणकावून सांगितले.

Mayor's pressures for 'review' | 'समीक्षा'साठी महापौरांचा दबाव

'समीक्षा'साठी महापौरांचा दबाव

सोलापूर : शहरातील कचरा उचलण्याचा ठेका घेतलेल्या समीक्षा कंपनीला काम करण्याची संधी द्यावी म्हणून महापौर अलका राठोड यांनी घेतलेल्या बैठकीत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कारवाईवर ठाम असल्याचे ठणकावून सांगितले. 
महापौर राठोड यांनी सोमवारी दुपारी महापौर निवासस्थानी कचर्‍यासंदर्भात अधिकारी, पदाधिकारी व संबंधित ठेकेदाराची बैठक घेतली. बैठकीला सभागृह नेते संजय हेमगड्डी, स्थायी समितीचे सभापती बाबा मिस्त्री, महिला व बालकल्याण सभापती खैरूनबी शेख, अँड. यु. एन. बेरिया, दिलीप कोल्हे, आनंद चंदनशिवे, आयुक्त गुडेवार, सहायक आयुक्त डॉ. पंकज जावळे, प्र. आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके आदी उपस्थित होते. महापौर राठोड यांनी शहरातील कचर्‍याची स्थिती बिकट झाली आहे. सण, उत्सव आहेत. महापालिकेने बिले दिली नसल्याने समीक्षा सक्षमपणे काम करू शकत नाही. प्रशासनाने ठेकेदाराला संधी द्यावी, अशी सूचना केली. त्यावर आयुक्त गुडेवार यांनी सभेत यावर चर्चा होऊन कारवाईचा ठराव मंजूर झाल्याचे निदर्शनाला आणले. त्यावर महापौरांनी ठेकेदाराशी चर्चा तरी करा असा हट्ट धरला. त्यावर आयुक्तांनी ठेका कोणी घेतला ती व्यक्ती अद्याप समोर आली नाही असे सांगितले. त्यावर महापौरांनी बैठकीत असलेल्या राठोड नावाच्या व्यक्तीबरोबर चर्चा करण्यास सांगितले. त्यावर आयुक्त गुडेवार यांनी याला आक्षेप घेतला. जी व्यक्ती समोर आहे ती ठाणे महापालिकेत कामाला आहे. या व्यक्तीबरोबर मी चर्चा करणार नाही अशी भूमिका घेतली. ठेका रवींद्र राठोड या व्यक्तीने घेतला आहे ती व्यक्ती समोर आली पाहिजे असे ठणकावून सांगितले. त्यावर महापौरांनी तुम्ही बोलत नसाल तर इतर अधिकार्‍यांना सांगा असे सुचवूनही आयुक्त ठाम राहिले. त्यामुळे रवींद्र राठोड ठेकेदार बैठकीसमोर हजर झाला. त्याला आयुक्तांनी करारातील अटी व शर्ती विचारल्या. पण त्याला व्यवस्थित उत्तरे देता आली नाहीत. पूर्वीची बिले सादर करा. नियमाप्रमाणे काम झालेच पाहिजे असे आयुक्तांनी ठणकावून सांगितल्यावर काम करण्याचे ठेकेदाराने आश्‍वासन दिले. कचरा उचलण्यासंदर्भात महापौरांनी सूचना कराव्यात, ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणे गैर आहे अशी प्रतिक्रिया आनंद चंदनशिवे यांनी व्यक्त केली. त्यावर सभागृह नेते हेमगड्डी, अँड. बेरिया यांनी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी अशी सूचना केली. (प्रतिनिधी) 

 

Web Title: Mayor's pressures for 'review'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.