सोलापुरात मराठा समाजाचा चक्का जाम
By Admin | Updated: January 31, 2017 14:43 IST2017-01-31T14:43:54+5:302017-01-31T14:43:54+5:30
मराठा समाजाच्यावतीने आरक्षणाच्या मागणीसहीत विविध मागण्यांसाठी 7 ठिकाणी तर जिल्ह्यातील तालुक्याच्या मुख्य ठिकाणांवर शांतताप्रिय मार्गाने चक्का जाम आंदोलन करण्यात आला.

सोलापुरात मराठा समाजाचा चक्का जाम
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 31 - मराठा समाजाच्यावतीने आरक्षणाच्या मागणीसहीत विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत शहरात 7 ठिकाणी तर जिल्ह्यातील तालुक्याच्या मुख्य ठिकाणांवर शांतताप्रिय मार्गाने चक्का जाम आंदोलन करण्यात आला.
यावेळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पुन्हा पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. जिल्ह्यातील काही ठिकाणी गावपातळीवरही आंदोलन करण्यात आले. शांतता मार्गाने आंदोलन करण्यात आले. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
सोलापूर शहरात भैय्या चौक, सोलापूर-पुणे महामार्गावर नागोबा मंदिराजवळ, जुना तुळजापूर नाका येथील पुलाजवळ, हैदराबाद रोड येथील मार्केट यार्डजवळ, आसरा चौक, विजापूर रोडवर आयटीआयजवळ तसेच अक्कलकोट रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ अशा सात ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
या आहेत मराठा समाजाच्या मागण्या
कोपर्डी प्रकरणातील आरोपीविरुद्ध तत्काळ भक्कम दोषारोपपत्र दाखल करून तो खटला द्रुतगती-जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी यासाठी शासनाने योग्य ते प्रयत्न करावेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अॅट्रॉसिटी अॅक्टमधील जाचक तरतुदी रद्द करून त्यामध्ये सुधारणा कराव्यात, अॅट्रॉसिटी अॅक्टमधील कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी जरुर त्या उपाययोजना कराव्यात, सकल मराठा समाजाला प्रथम टप्प्यात शैक्षणिक व नोकरीत पूर्णपणे ओबीसी दर्जाचे आरक्षण मिळावे, महाराष्ट्रातील मराठा समाजाला इतर मागास वर्गात ओबीसीमध्ये समाविष्ट करुन घेऊन सरसकट मराठा समाजाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, इऱ्बी़सी़ सवलतीची मर्यादा रुपये सहा लाखांपर्यंत मिळावी, शेतक-यांच्या मुलांना उच्च शिक्षण मोफत मिळावे, राज्यातील आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ करिता भरीव निधीची तरतूद करावी, मराठा आरक्षणाचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयात भक्कम मांडण्याकरिता जरुर ती उपाययोजना प्रशासकीय पातळीवरुन करण्यात यावी, राज्यातील शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, शेतक-यांच्या शेतीमालाला व कृषीपूरक उत्पादनाला हमीभाव मिळावा, शेतक-यांना पेन्शन योजना लागू करावी, आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय नोकरीत समाविष्ट करुन घ्यावे, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या वारसाला १० लाख रुपयांची तातडीची मदत करावी, राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता शासकीय मराठा वसतिगृह सुरू करावे, मुंबई येथे अरबी समुद्रात जागतिक दर्जाचे शिवस्मारक तत्काळ पूर्ण करावे, महिला सुरक्षिततेसाठी कठोर कायदे करावेत आदी विविध मागण्यांसाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यात असा होता पोलीस बंदोबस्त
पोलीस बंदोबस्तात ७ उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ पोलीस निरीक्षक, ७२ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, १०७९ पोलीस कर्मचारी, ५ दंगा नियंत्रण पथक (एका पथकामध्ये १५ पोलीस), १६ स्ट्रायकिंग फोर्स (एका पथकात १० पोलीस), शीघ्र कृतीदल, ४०० होमगार्ड पुरुष, १०० होमगार्ड महिला असा एकूण १ हजार ७०८ जणांचा समावेश होता.
शहरात होता तगडा बंदोबस्त तैनात
पोलीस आयुक्तांनी शहरातील सात ठिकाणी झालेल्या आंदोलनासाठी प्रत्येक ठिकाणी अॅब्युलन्स, क्रेन, डीपरसह प्रत्येकी ठिकाणी ३० असा २१०० पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. यावर नियंत्रणासाठी स्वत: पोलीस आयुक्त, तीन पोलीस उपायुक्त, सहा. पोलीस आयुक्त अशी यंत्रणा कार्यरत होते. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग प्राधिकरणाची यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.