महामूद पटेल यांच्या फुप्फुस प्रत्यारोपणाचा प्रयत्न असफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:21 IST2021-05-24T04:21:27+5:302021-05-24T04:21:27+5:30
सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांच्या फुप्फुसाचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय झाला होता. ...

महामूद पटेल यांच्या फुप्फुस प्रत्यारोपणाचा प्रयत्न असफल
सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामूद पटेल यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांच्या फुप्फुसाचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
२३ एप्रिल रोजी महामूद पटेल आणि त्यांची पत्नी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी बेड मिळत नव्हते. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धावपळ करून त्यांना बेड मिळवून दिले. त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत होता. आठ दिवसांपासून त्यात सुधारणा होत असल्याने त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले. काल शनिवारी अचानक बिघाड झाला. ऑक्सिजन पातळी खालावली. फुप्फुस निकामी झाल्याने बदलण्याशिवाय पर्याय नसल्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला.
शेतकरी संघटनेचे नेते पाशा पटेल आणि जाफरताज पाटील यांनी डॉक्टरांशी संपर्क केला. त्यांच्याशी चर्चा केली. फुप्फुस प्रत्यारोपणाचा खर्च आणि त्याची प्रक्रिया जाणून घेतली. पाशा पटेल यांनी तातडीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधला. गडकरी यांनीही पाशा पटेल यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. चर्चेच्या दुसऱ्या फेरीदरम्यान महामूद पटेल कोमात गेले. त्यांची प्रकृती सध्या नाजूक असून फुप्फुस प्रत्यारोपणाचा विषय प्रकृती स्थिर झाल्यानंतर विचार करता येईल या मुद्द्यावर थांबला. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही आज सकाळीच त्यांची प्राणज्योत मालवली.
------
राजू शेट्टी यांच्याकडून चौकशी
माजी खा. राजू शेट्टी हे देखील महामूद पटेल यांच्या प्रकृतीची सातत्याने चौकशी करीत होते. कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. त्यांना कोणतीही मदत करण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, पंढरपूरच्या निवडणुकीत आठ दिवस आम्ही सोबतच होतो. ती निवडणूकच त्यांना भोवली अशी उद्विग्न प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली.
--------
जावई आणि पत्नीचा महिन्यात मृत्यू
महामूद पटेल यांचे जावई इरफान शेख यांचा २७ एप्रिल रोजी कोरोनाने मृत्यू झाला. लहान वयात मुलीला वैधव्य आल्याने ते अस्वस्थ झाले असतानाच त्यांना आणि पत्नी लैलाबी पटेल यांना कोरोनाने गाठले. १७ मे रोजी पत्नीचे निधन झाले. कालपर्यंत ते पत्नीच्या आजाराची विचारपूस करीत होते. ४० दिवसांच्या अंतरात एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने बळी घेतला.
--------
संघर्षाची ३८ वर्षे
महामूद पटेल अल्पभूधारक शेतकरी. स्वभाव अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचा. १९९३ साली शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात वसंतराव आपटे आणि जाफरताज पाटील यांच्या संघर्ष यात्रेत सहभागी झाले. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, राजू शेट्टी यांच्या ऊस आंदोलनात त्यांचा हिरिरीने सहभाग होता. उसाला एफआर मिळाला पाहिजे यासाठी बारामती येथे गेलेल्या शेतकऱ्यांच्या संघर्ष यात्रेत वसंतराव आपटे यांच्यासोबत ते अग्रभागी होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी ३८ वर्षे चळवळीत काम केले. संघर्ष, लढे उभारले. जिल्ह्यात दूध दरवाढ, उसाला एफआरपी, विजेच्या प्रश्नांवर अखेरपर्यंत लढत राहिले. गरिबीत राहूनही चळवळ नेटाने पुढे नेली.