पेट्रोल टाकायला जाताना ताबा सुटला; बाईकस्वाराचा नाल्यात पडून मृत्यू
By विलास जळकोटकर | Updated: January 2, 2024 16:38 IST2024-01-02T16:37:46+5:302024-01-02T16:38:03+5:30
पेट्रोल आणण्यासाठी पंपाकडे जात असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने बाईकसह नाल्यात पडला.

पेट्रोल टाकायला जाताना ताबा सुटला; बाईकस्वाराचा नाल्यात पडून मृत्यू
सोलापूर : पेट्रोल आणण्यासाठी पंपाकडे जात असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने बाईकसह नाल्यात पडला. शासकीय रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री ११:३० च्या सुमारास मुळेगाव तांडा रोडवरील नाल्यात हा अपघात झाला. शिवशंकर नागनाथ मरगल (वय- ४१, रा. सग्गम नगर, जुना विडी घरकूल, सोलापूर) असे मयत बाईकस्वाराचे नाव आहे.
यातील मयत बाईकस्वार सोमवारच्या रात्री ११:३० च्या सुमारास जुना विडी घरकूल, सग्गम नगर येथून पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचे कळाल्याने रात्रीच बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी सोन्या मारुती पेट्रोल पंपाकडे चालला होता. अचानक त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो बाईकसह मुळेगाव तांड्याच्या अलिकडे असलेल्या नाल्यात जावून कोसळला.
यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. तो बेशुद्ध झाला. या घटनेची वार्ता समजताचा नातलग नाल्याकडे धावले. बेशुद्धावस्थेत त्याला मंगळवारी रात्री १ वाजता त्याचा मेव्हणा भास्कर म्हाडा याने येथील शासकीय रुग्णायलात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
मयत शिवशंकर याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. एक मुलगी १२ वी दुसरा मुलगा इयत्ता ९ वीत शिकत असल्याचे त्याचे नातलग भास्कर म्हाडा यांनी सांगितले.