सोशल मीडियाच्या प्रचारावर करडी नजर
By Admin | Updated: January 31, 2017 17:19 IST2017-01-31T17:19:24+5:302017-01-31T17:19:24+5:30
सोशल मीडियाच्या प्रचारावर करडी नजर

सोशल मीडियाच्या प्रचारावर करडी नजर
सोशल मीडियाच्या प्रचारावर करडी नजर
करमाळा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करण्यात येत असून फेसबुक, टिष्ट्वटर व्हॉट्सअॅपव्दारे उमेदवाराचा प्रचार करण्याअगोदर निवडणूक आयोगाची परवानगी घेणे आवश्यक आहे. एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रुुपवर उमेदवाराचा प्रचार विनापरवानगीने केला गेला व त्यासंदर्भात तक्रार आली तर ग्रुप अॅडमिन व ज्याने पोस्ट टाकली त्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संजय पवार यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवास खर्चाची मर्यादा ३ लाख रुपये असून पंचायत समितीच्या निवडणुकीत उभा राहणाऱ्या उमेदवारास खर्चाची मर्यादा २ लाख रुपये आहे.तर उमेदवारी अर्ज भरताना शौचालय वापरत असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया खुल्या वातावरणात व पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आदर्श आचारसंहिता नियमाची काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी उमेदवार व कार्यकर्त्यांची आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवाराने ३ लाख रुपयापर्यंत तर पंचायत समितीमध्ये उभे राहणाऱ्या उमेदवाराने २ लाख रुपये पर्यंतच खर्च करण्याची मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिलेली आहे. निवडणुकीस उभे राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने स्वत:च्या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडून त्या खात्यातून चेकद्वारा खर्च करावयाचा आहे.केलेल्या खर्चाचा हिशोब रोजच्या रोज निवडणूक शाखेकडे देणे उमेदवारास बंधनकारक आहे.
--------------------
स्वतंत्र कक्ष उघडणार
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी व आचारसंहितेचे पालन करण्यासाठी निवडणूक शाखेत सोशल मीडिया, प्रचार, प्रसार यासाठी स्वतंत्र कक्षा उघडण्यात येणार आहे. त्याव्दारे उमेदवार त्याचे समर्थक कार्यकर्ते यांचा प्रचार, सभा या सर्व गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप आदी प्रचारमाध्यमातून खोटा, बदनामीकारक प्रचार केला गेला तर त्यावर लगेच कारवाई करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक व प्रेस मीडियात उमेदवाराचा केलेला प्रचार याकडेही या शाखेचे लक्ष असणार असून उमेदवाराने प्रचार व प्रसिद्धी माध्यमाद्वारे केलेल्या प्रचाराचा खर्च निवडणूक शाखेकडे देणे बंधनकारक आहे.
----------------------
शौचालय वापरत असल्याच्या प्रमाणपत्राची अट..
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराकडे शौचालय वापरत असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असून त्या उमेदवाराने प्रमाणपत्र घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जासोबत दाखल करावे या आशयाचे परिपत्रक जारी झाले आहे. स्वत:च्या मालकीचे अथवा भाड्याच्या घरात राहत असल्यास त्या घरात शौचालय आहे की सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत आहे असे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.