लोकशाहीर अमर शेख स्मारक अद्यापही दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST2020-12-30T04:29:44+5:302020-12-30T04:29:44+5:30
२०१६ साली अमर शेख यांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबई विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात तत्कालीन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, उल्हास पवार यांनी ...

लोकशाहीर अमर शेख स्मारक अद्यापही दुर्लक्षित
२०१६ साली अमर शेख यांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबई विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात तत्कालीन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, उल्हास पवार यांनी स्मारकाच्या उभारणीला पाठबळ देऊ, असे आश्वासन दिले होते. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही स्मारक उभारणीसाठी बळ देऊ, असे सांगितले होते. त्यानंतर चार वर्षांत याबाबत काहीच कार्यवाही न झाल्याने मार्च २०२० मध्ये नव्याने स्थापन झालेल्या शाहीर अमर शेख प्रतिष्ठानने ही मागणी लावून धरली आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद गोरे, उपाध्यक्ष प्रा. प्रफुल्ल गाढवे, सचिव पा. न. निपाणीकर आदी पदाधिकारी याबाबत पाठपुरावा करीत आहेत. शाहीर अमर शेख यांचे स्मारक व्हावे, अशी तळमळ असणारे वायुपुत्र नारायण जगदाळे व प्राचार्य मधुकर फरताडे हे समिती सदस्य कालवश झाले. जगदाळे यांनी या स्मारकाच्या उभारणीसाठी वैयक्तिक एक लाख रुपयांची देणगी देऊन लोकशाहिरांबद्दलचा आदरही व्यक्त केला होता.
----
अमर शेख यांचे कार्य तेवत ठेवण्यासाठी त्यांच्या नावाने बार्शीत महाराष्ट्र साहित्य परिषद गेली १५ वर्षे चार पुरस्कार देत आहे. मात्र या अजरामर शाहिराची थोरवी नव्या पिढीला माहीत होण्यासाठी त्यांचे भव्य स्मारक होणे हेच त्यांच्या कार्याला खरे अभिवादन असेल.
- पा. न. निपाणीकर, सचिव : शाहीर अमर शेख प्रतिष्ठान - बार्शी.
------
लोककलावंतांना व्यासपीठ
लोककला लोप पावू नये. शाहिरीसारख्या अभिजात कलाप्रकाराची जपणूक करण्यासाठी स्मारकाची आवश्यकता आहे. प्रस्तावित स्मारकाच्या माध्यमातून लोककलावंतांना व्यासपीठ मिळावे ही प्रतिष्ठानची भूमिका आहे. स्मारकाच्या मागणीकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे यांच्यासह बार्शीकरांनी केली आहे.
----
असे असेल स्मारक
- प्रतिष्ठानच्या एक एकर जागेत प्रस्तावित स्मारकामध्ये सभागृह, व्यासपीठ, स्मृती संग्रहालय, ग्रंथालय, अतिथी निवास असा या स्मारकासाठी अंदाजे दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. शासनाने जागा देऊन स्मारक बांधणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शाहीर अमर शेख प्रेमींची आहे.
----