सोलापूरात पत्नीचा खून करणाºया पतीस जन्मठेप
By Appasaheb.dilip.patil | Updated: August 1, 2017 17:51 IST2017-08-01T17:49:50+5:302017-08-01T17:51:31+5:30
सोलापूर दि १ : पत्नीचा गळा दाबून खून केल्याच्या गुन्ह्याखाली आरोपी पती प्रभाकर यशवंत कलागते (वय ३५, रा. मजरेवाडी, सोलापूर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी न्यायालयापुढे आलेले सबळ पुरावे ग्राह्य मानून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सोलापूरात पत्नीचा खून करणाºया पतीस जन्मठेप
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ : पत्नीचा गळा दाबून खून केल्याच्या गुन्ह्याखाली आरोपी पती प्रभाकर यशवंत कलागते (वय ३५, रा. मजरेवाडी, सोलापूर) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी न्यायालयापुढे आलेले सबळ पुरावे ग्राह्य मानून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला. शनिवारी या प्रकरणी झालेल्या सुनावणीत या प्रकरणातील सासू-सासºयास सबळ पुराव्याअभावी मुक्त करून मयत सुषमा कलागतेचा पती प्रभाकर यास याला दोषी धरले होते.
मयत सुषमाचा (वय २३, रा. मजरेवाडी, सोलापूर) विवाह प्रभाकर यशवंत कलागते याच्याशी १ जून २०१० रोजी झाला होता. विवाहानंतर सुषमास मूल होत नाही म्हणून सासू सुरेखा कलागते, सासरा यशवंत कलागते, पती प्रभाकर कलागते यांच्याकडून छळ होत असे. या काळात सुषमाला प्रतीक्षा नावाची मुलगी देखील झाली होती. यावरही आरोपींचा छळ सुरूच होता. ७ आॅक्टोबर २०१३ रोजी यातील आरोपींनी सुषमाशी भांडण करून तिचा गळा दाबून खून केला, अशा आशयाची फिर्याद मयताची आई राजश्री अरुण निस्ताने हिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.दं. वि. ३०७, ३०२ सह ३४ अन्वये गुन्हा नोंदला होता.
---------------
सरकार पक्षाचा युक्तिवाद
या खटल्यात सरकार पक्षाकडून अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी तर आरोपीकडून अॅड. प्रशांत देशमुख यांनी काम पाहिले.
या खटल्यात सरकारतर्फे ११ साक्षीदार तपासले. सरकार पक्षाने युक्तिवादात मयत सुषमा ही आरोपींच्या ताब्यात असताना मयत झाल्याने व उपलब्ध वैद्यकीय पुरावा आणि पंचनामा, परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय अधिकाºयांची साक्ष या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. आरोपी प्रभाकर कलागते हा खुनाच्या आरोपाखाली दोषी असल्याने त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने सुनावणीत न्यायालयापुढे आलेल्या साक्षीपुराव्याच्या आधारे आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर मयताची सासू सुरेखा व सासरा यशवंत कलागते यांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडले.
----------------
दंडाची रक्कम प्रतीक्षाला देण्याचा आदेश
आरोपी असलेल्या प्रभाकर कलागते याने पत्नीचा खून केल्याने त्यांना असलेली लहान मुलगी प्रतीक्षा आई मयत झाल्याने आणि पिता शिक्षेस पात्र ठरल्याने अनाथ झाली आहे. तिच्या पालनपोषणाच्या दृष्टीने पाच लाख रुपयांची मागणी सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी केली. न्यायालयाने याची दखल घेत आरोपीला दोन लाख रुपयांचा दंड सुनावला. संबंधित रक्कम प्रतीक्षास देण्याचा आदेश दिला. तोपर्यंत संबंधित रक्कम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे ठेवण्याचे निर्देश निकालाद्वारे न्यायालयाने दिले.