बियाणे विक्रेत्यांचा परवाना सोलापूर कृषी विभागाकडून २५ ऑगस्टपर्यंत निलंबित
By काशिनाथ वाघमारे | Updated: May 2, 2024 20:11 IST2024-05-02T20:11:38+5:302024-05-02T20:11:55+5:30
ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी केली आहे

बियाणे विक्रेत्यांचा परवाना सोलापूर कृषी विभागाकडून २५ ऑगस्टपर्यंत निलंबित
काशिनाथ वाघमारे, सोलापूर: कुंभारवेस येथील मे. बसवेश्वर कृषी सेवा केंद्राच्या तपासणीत गंभीर दोष आढळल्याने खत, बियाणे व कीटकनाशक असे तीनही परवाने २५ ऑगस्ट २०२४ पर्यंत निलंबित करण्यात आले आहेत. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी केली आहे.
कीटकनाशक, बियाणे व खत निरीक्षक तथा उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीचे कृषी अधिकारी रामचंद्र कांबळे यांनी केलेल्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी तपासणी अहवालावर सुनावणी घेतली. सुनावणीत बसवेश्वर कृषी सेवा केंद्राचा खुलासा समाधानकारक आढळला नाही.
बियाणे विक्री परवाना वेळेत नूतनीकरण केले नाही, बियाण्यासाठी रजिस्टर व विक्री रजिस्टर ठेवले नाही, विक्रीसाठी ठेवलेल्या सर्व बियाण्यांचे रेकॉर्ड ठेवले नाही, कीटकनाशक पुरवठा प्रमाणपत्र मंजूर नसताना विक्री करणे, मुदतबाह्य कृषी निविष्ठा विक्री केल्या, कृषी निविष्ठांचे वेळेत नूतनीकरण केले नसल्याचे आरोप निलंबन आदेशात करण्यात आले आहेत. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे हे ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर आलेल्या दत्तात्रय गवसाने यांच्या कालावधीत १० महिन्यांत खत दुकानावर पहिली कारवाई झाली आहे.