मतदार यादीतील ठराव गोळा करण्यासाठी नेतेमंडळीची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:27 IST2021-08-20T04:27:35+5:302021-08-20T04:27:35+5:30
करमाळा : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. ...

मतदार यादीतील ठराव गोळा करण्यासाठी नेतेमंडळीची धावपळ
करमाळा : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. स्वत:ला मतदान करील अशाच कट्टर सदस्याचा ठराव करून घेण्यासाठी इच्छुक नेतेमंडळींची धावपळ सुरू झाली आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या प्रारूप मतदार याद्या सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणामार्फत तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्हा बँकेवर निवडावयाच्या संचालकासाठी गावपातळीवरील विविध कार्यकारी सोसायट्याच्या प्रतिनिधीला मतदानाचा अधिकार असतो. करमाळा तालुक्यात एकूण ११३ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या कार्यरत आहेत. प्रत्येक सोसायटीमधून एका सदस्यास मतदान करण्यासाठी अधिकार देण्याचा ठराव करून तो ठराव मतदार यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकपूर्व मतदार याद्या तयार करण्यासाठी गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे मतदार ठरवण्यासाठी नेते मंडळीकडून धावपळ सुरू झाली आहे. करमाळा तालुक्यात एकूण ११३ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या कार्यरत आहेत. सर्वाधिक सोसायट्यांवर माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे वर्चस्व आहे. त्याखालोखाल बागल गट व माजी आमदार नारायण पाटील गटाच्या सोसायट्या आहेत. मतदार याद्या तयार करताना आपल्याला मतदान करणाऱ्या कट्टर कार्यकर्त्यांचा ठराव करून घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.
करमाळा तालुक्यातून माजी आ. जयवंतराव जगताप सलग सहा वेळा डीसीसी बँकेवर संचालक राहिले असून ते बँकेचे उपाध्यक्षही होते. बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यासुद्धा संचालक होत्या. जगताप, बागल व पाटील हे तीनही गट ठराव गोळा करण्यात मश्गूल झाले आहेत.