लऊळचा मनोरुग्ण सापडला पाक सीमेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST2021-02-05T06:45:57+5:302021-02-05T06:45:57+5:30

कुर्डुवाडी : मानसिक आजारावर उपचारासाठी लऊळ (ता. माढा) पुण्यात गेलेला मनोरुग्ण पत्नीला हिसका मारून पळाला. दहा वर्षांनंतर नुकताच तो ...

Laul's psychiatrist found on Pak border | लऊळचा मनोरुग्ण सापडला पाक सीमेवर

लऊळचा मनोरुग्ण सापडला पाक सीमेवर

कुर्डुवाडी : मानसिक आजारावर उपचारासाठी लऊळ (ता. माढा) पुण्यात गेलेला मनोरुग्ण पत्नीला हिसका मारून पळाला. दहा वर्षांनंतर नुकताच तो पाकिस्तान सीमेवर जवानांना आढळला. त्याला भारतीय जवानांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याला घेण्यासाठी कुर्डुवाडीतून एक पथक अमृतसरला रवाना झाले आहे.

सत्यवान निवृत्ती भोंग (वय ४०, रा. लऊळ, ता. माढा) असे त्या मनोरुग्णाचे नाव आहे. सत्यवान यांनी डिझेल मेकॅनिकलचे उच्च शिक्षण घेतलेले आहे. स्वत:च्या लग्नानंतर काही वर्षांतच त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले. दहा वर्षांपूर्वी पुण्यातील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पत्नीबरोबर गेले. एका मोठ्या दवाखान्यात आले असता पत्नीच्या हाताला हिसका मारून गर्दीत पळून गेले.

त्यानंतर ते मानसिक रुग्ण असल्याने देशभरात प्रवास करीत अचानक पाकिस्तानच्या सीमेवर काही महिन्यांपूर्वी पोहोचले. पाकिस्तानच्या जवानांनी त्यांना तेथून ताब्यात घेतले आणि त्याला कारागृहात ठेवले.

स्वत: भारतीय असल्याचे तो सांगू लागला. तो खरोखरच मनोरुग्ण असल्याचे समजल्यानंतर तेथील जवानांनी त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी तेथील भारतीय जवानांकडे सोपविले. त्यावर भारतीय जवानांनी त्याची कसून चौकशी केली. या चौकशीत त्याने स्वत:च्या गावची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर भारतीय जवानांनी कुर्डुवाडी पोलिसांशी संपर्क साधून ओळख पटवून घेतली.

त्याच्या नातेवाईकांनीही त्याला ओळखले. कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांचे पथक आणि भोंग यांच्या कुटुंबातील दोन सदस्य यांचे पथक अमृतसर येथून त्याला आणण्यासाठी शनिवारी निघाले आहे.

---

वरच्या पातळीवरून हलली सूत्रे

काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या जवानांनी त्यास भारतीय जवानांच्या हाती सोपविले. परंतु, देशभरात कोरोना असल्याने याबाबत सरकारी हालचाली मंदावल्या. ते अमृतसर येथेच अडकून पडले. परंतु, अमृतसर येथील भारतीय जवानांनी पुन्हा मुंबई पोलिसांकडे याबाबत पत्रव्यवहार केला. मुंबई पोलिसांनी कुर्डुवाडी पोलिसांना याबाबत त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. शनिवारी येथील पोलीस पथक अमृतसर येथे त्याला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहे. यावेळी त्याच्या कुटुंबातील दोन सदस्यही असणार आहेत. यामुळे सत्यवान भोंग यांच्या नातेवाईकांबरोबरच कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना आनंद झाला आहे.

Web Title: Laul's psychiatrist found on Pak border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.