वस्त्रोद्योगात आजही झळकतात ‘कामगार पाहिजेत’चे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 12:48 PM2019-05-02T12:48:30+5:302019-05-02T12:51:52+5:30

महाराष्ट्र, कामगार दिन विशेष; कारखानदारांची मुले वस्त्रोद्योगातील करिअर व संधी टाळून आयटी क्षेत्रात स्थिरस्थावर होत आहेत

The laborers needing to be seen in the textile industry | वस्त्रोद्योगात आजही झळकतात ‘कामगार पाहिजेत’चे फलक

वस्त्रोद्योगात आजही झळकतात ‘कामगार पाहिजेत’चे फलक

googlenewsNext
ठळक मुद्देकुशल कामगारांचा तुटवडा सातत्याने जाणवत असून, टेक्स्टाईलमध्ये काम करण्यासाठी नवीन पिढी येताना दिसत नाही.आधुनिकीकरण झपाट्याने होत आहे. परंतु त्याच गतीने कामगारांचे कौशल्य वाढवण्यामध्ये कामगार कमी पडत आहेत

जगन्नाथ हुक्केरी 

सोलापूर : नावाजलेल्या सोलापूरच्यावस्त्रोद्योगात मालकांकडून कामाची हमी नसल्याने नेहमीच कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे औद्योगिक वसाहतीत असलेल्या प्रत्येक कारखान्यासमोर ‘कामगार पाहिजेत’, असे फलक झळकत आहेत.

महागाईचा वेढा सूत, रंग, वीज, पगार, वाहतूक खर्चाबरोबरच इतर उत्पादन खर्चालाही पडला आहे. यामुळे दिवसेंदिवस वस्त्रोद्योग शेतीप्रमाणे आतबट्ट्यातच जात आहे. मंदीच्या नावाखाली मालाला उठाव नसल्याने गरज नसताना मालक कामगारांना सुट्टी देत आहेत. यातून कामाची शाश्वती मिळेना. वस्त्रोद्योग कामगारांच्या पत्नी विडी वळण्याकडे वळल्या आहेत. यामुळे प्रपंच भागविण्याइतपत त्यांना उत्पन्न मिळत आहे. यातून पुरूष मंडळी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शिवाय नवीन शिकलेल्या पिढींकडे उभारून आठ ते दहा तास श्रम करण्याची मानसिकता नाही.

मुलांचे भवितव्य धोक्यात येऊ नये, म्हणून त्यांना उच्च शिक्षित करीत आहेत. शिकलेली मुले हैदराबाद, मुंबई, पुणे व बंगळुरू येथे नोकरीस जात आहेत. त्यातल्या त्यात अल्प शिक्षित मुलेही कमी श्रम असलेल्या चाटी गल्लीसह इतर ठिकाणी नोकरी शोधत आहेत. नजरचुकीने कामगारांकडून फॉल्ट झाला, कांडी तुटली, धोटा गेला तर त्याची नुकसानभरपाई कारखानदार कामगारांकडून वसूल करतात. हा धोकाही कामगारांना नको आहे. शिवाय नोकरी आज आहे, उद्या नाही, अशी स्थिती या उद्योगात आहे. यामुळे कामगार वस्त्रोद्योगातील कामच नको, असे म्हणत आहेत.

कारखानदारांची मुलेही ‘आयटी’त
- मंदी, महागाई, विक्री यातील धोका नको म्हणत दस्तुरखुद्द कारखानदारांची मुले वस्त्रोद्योगातील करिअर व संधी टाळत उच्च शिक्षण घेऊन आयटी क्षेत्रात स्थिरस्थावर होत आहेत. पूर्वी कारखाने असलेल्यांना मुली दिल्या जायच्या. पण आता कारखानदारांऐवजी नोकरदाराला लग्नासाठी अधिकच पसंती देण्यात येत आहे. यामुळे हा धोका पत्करण्याची मानसिकता कारखानदारांच्या मुलांमध्येही नसल्याचे टॉवेल निर्यातदार अशोक संगा यांनी सांगितले.


वस्त्रोद्योगात नवीन कामगार येण्यास तयार नाहीत. त्यांच्याकडे श्रम करण्याचीही मानसिकता नाही. त्यांना जास्त सवलती हव्या आहेत. ते मिळत नसल्याने त्यांची नाराजी आहे. यामुळे या क्षेत्रात कामगारांचा तुटवडा जाणवत आहे.
-शेखर गुर्रम, 
टॉवेल उत्पादक


कुशल कामगारांचा तुटवडा सातत्याने जाणवत असून, टेक्स्टाईलमध्ये काम करण्यासाठी नवीन पिढी येताना दिसत नाही. आधुनिकीकरण झपाट्याने होत आहे. परंतु त्याच गतीने कामगारांचे कौशल्य वाढवण्यामध्ये कामगार कमी पडत आहेत.
- राजेश गोसकी,
अध्यक्ष, टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन

Web Title: The laborers needing to be seen in the textile industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.