कुसूर - खानापुरात दोन दिवस पुकारला जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:23 IST2021-05-06T04:23:39+5:302021-05-06T04:23:39+5:30
दक्षिण सोलापूर : कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर खानापूर ग्रुप ग्रामपंचायतीने दोन दिवसांचा जनता कर्फ्यू ...

कुसूर - खानापुरात दोन दिवस पुकारला जनता कर्फ्यू
दक्षिण सोलापूर : कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर खानापूर ग्रुप ग्रामपंचायतीने दोन दिवसांचा जनता कर्फ्यू जारी केला आहे. या कर्फ्यूला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, पहिल्या दिवशी दिवसभर गजबजलेले चौक निर्मनुष्य झाले होते.
गेल्या आठवड्यात कुसूर खानापूर गावामध्ये कोरोना संसर्ग वाढला. गावातील चारजणांना कोरोनाची लागण झाली. यात दोन रुग्णांचा बळी गेला. येथील ग्रामस्थांना कोरोनाच्या भीतीने ग्रासले आहेत. ग्रामस्थ तपासणीसाठी पुढे येत नाहीत. किरकोळ स्वरूपाची लक्षणे असताना उपचारासाठी डॉक्टरकडे जात नाहीत. घरातच राहून आजार अंगावर काढतात, अशी स्थिती दिसून आली. कुसूर - खानापूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनंदा कोळी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने अशा आजारी व्यक्तींना समजावण्याचा प्रयत्न केला.
आजाराविषयी पुरेशी माहिती नाही. अन्य रुग्णांच्या सांगण्यावरून मनात भीती बाळगलेले अनेक रुग्ण राजरोसपणे गावात फिरत होते. त्यामुळे सरपंच सुनंदा कोळी यांनी बुधवार आणि गुरुवार असे सलग दोन दिवस जनता कर्फ्यू जाहीर केला. सकाळी सात वाजल्यापासून ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद देत दिवसभर कोणीही बाहेर पडले नाही. एरवी गजबजलेले चौक निर्मनुष्य दिसत होते. दोन्ही गावात पूर्णतः शुकशुकाट होता. दैनंदिन कामासाठीही बाहेर पडण्याचे ग्रामस्थांनी टाळले.
------
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्ण निष्काळजीपणे वागत आहेत. त्यांच्या बेफिकिरीमुळे इतरांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही सर्वानुमते दोन्ही गावात जनता कर्फ्यू जाहीर केला. हा निर्णय सामूहिक असल्याने उत्तम प्रतिसाद मिळाला.
- सुनंदा कोळी, सरपंच,
कुसूर-खानापूर ग्रुप ग्रामपंचायत
----