खवासपूरमध्ये भावजयीला मारहाण करून पुतण्याला घेतला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:27 IST2021-04-30T04:27:27+5:302021-04-30T04:27:27+5:30

सांगोला : दारात कचरा टाकू नका, शेळ्या वैरणीच्या गंजीवर सोडू नका म्हटल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या पती-पत्नीने मारहाण करून ...

In Khawaspur, Bhavjayi was beaten and his nephew was bitten | खवासपूरमध्ये भावजयीला मारहाण करून पुतण्याला घेतला चावा

खवासपूरमध्ये भावजयीला मारहाण करून पुतण्याला घेतला चावा

सांगोला : दारात कचरा टाकू नका, शेळ्या वैरणीच्या गंजीवर सोडू नका म्हटल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या पती-पत्नीने मारहाण करून भावजयीला दमदाटी केली. यावेळी आईला मारहाणीतून सोडवायला आलेल्या मुलाच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ चुलत्याने तोंडाने चावा घेऊन जखमी केले. २७ एप्रिल रोजी रात्री ८:३० च्या सुमारास सांगोला तालुक्यातील खवासपूर येथे ही घटना घडली.

सुरेखा जगन्नाथ जरे या कुटुंबासमवेत खवासपूर येथे वास्तव्यास आहेत. त्यांना दीर रामचंद्र गंगाराम जरे हे त्रास देण्याच्या उद्देशाने स्वत:च्या शेळ्या सुरेखा यांच्या वैरणीच्या गंजीवर सोडत. यामुळे सुरेखा यांनी दीर रामचंद्र व जाऊ सुषमा यांना शेळ्या वैरणीच्या गंजीवर सोडू नका म्हणून समजावून सांगितले होते.

दरम्यान, २७ एप्रिल रोजी रात्री ८:३० च्या दरम्यान जाऊ सुषमा हिने मुद्दामहून सुरेखाच्या दारात कचरा टाकला. तिने सुषमाला विचारणा केली असता, तिने दारात कचरा टाकणार, शेळ्याही वैरणीच्या गंजीवर सोडणार, तुला काय करायचे ते कर म्हणत दम दिला. त्यानंतर सुषमा व दीर रामचंद्र यांनी सुरेखास मारहाण करून दमदाटी केली.

चुलता-चुलती आईस मारहाण करीत असल्याचे पाहून मुलगा विकास हा सोडविण्यासाठी आला असता, त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ चावा घेऊन जखमी केले. याबाबत सुरेखाने फिर्याद दिली असून, पोलिसांनी त्या दांपत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: In Khawaspur, Bhavjayi was beaten and his nephew was bitten