कार्तिक वारी, सुटीमुळे पंढरीत भाविकांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 04:18 IST2017-10-27T18:24:46+5:302017-10-29T04:18:33+5:30

चंद्रभागा स्नानाला अधिक महत्व आहे़ म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशासह अन्य भागातील भाविक पंढरीत दाखल होताच त्यांची पावले आपोआपच चंद्रभागेकडे वळत आहेत़...

Kartik Vary, due to holidays, increased number of devotees in Pandit | कार्तिक वारी, सुटीमुळे पंढरीत भाविकांच्या संख्येत वाढ

कार्तिक वारी, सुटीमुळे पंढरीत भाविकांच्या संख्येत वाढ

ठळक मुद्देपुंडलिक मंदिर पाण्याखाली नगरपरिषदेच्या वतीने आपत्कालिन यंत्रणा कार्यान्वित २४ तास दर्शन सेवा उपलब्ध केल्याने भाविकांची सोय

प्रभू पुजारी

पंढरपूर : 
‘पंढरीचा वास चंद्रभागे स्नान !
आणिक दर्शन विठोबाचे !!
हेचि घडो मज जन्मजन्मांतरी !
मागणे श्रीहरी नाही दुजे !!’  

या संत वचनाप्रमाणे चंद्रभागा स्नानाला अधिक महत्व आहे़ म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशासह अन्य भागातील भाविक पंढरीत दाखल होताच त्यांची पावले आपोआपच चंद्रभागेकडे वळत आहेत़ सध्या चंद्रभागा नदीपात्रात भरपूर पाणी असून अजूनही पुंडलिक मंदिर पाण्याखाली आहे़ स्वच्छ, निर्मळ आणि वाहते पाणी असल्याने भाविकांची चंद्रभागा पवित्र स्नान करण्यासाठी गर्दी होत आहे़ 
दिवाळी सुटी, अवघ्या पाच दिवसांवर आलेली कार्तिकी वारी आणि यंदा सर्वत्र समाधानकारक झालेला पाऊस़ यामुळे पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांची संख्येत दिवसेन्दिवस वाढच होत असल्याचे दिसून येत आहे़ सध्या एस़ टी़, रेल्वे आणि खासगी वाहनांनी भाविक पंढरीत येत आहेत़ त्यामुळे शहरातील स्टेशन रोड, शिवाजी चौक, अंबाबाई पटांगण, प्रदक्षिणा मार्ग, गोपाळपूर रस्ता आदी ठिकाणी भाविकांची गर्दी दिसून येत आहे़ 
गेल्या चार ते पाच वर्षांत दुष्काळी स्थिती असल्याने कार्तिकी वारीसाठी खास करून उजनीतून पाणी सोडावे लागत होते, मात्र यंदा उजनी धरण १०० टक्के भरले आहे़ शिवाय मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र ओढे, नाले, तलाव भरून वाहू लागले आहेत़ ओढ्याचे पाणी नदीपात्रात मिसळत असल्याने सध्या चंद्रभागा तुडंूब भरून वाहू लागली आहे़ भाविक पंढरीत पाऊल ठेवताच प्रथम चंद्रभागेत स्नान करून पावन होऊन लागले आहेत़ ज्या भक्तराज पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी परब्रम्ह परमात्मा पांडुरंग आला आणि त्याच्या प्रार्थनेनुसार त्याने दिलेल्या विटेवर युगे अठ्ठावीस भक्तांना दर्शन देऊन कृतार्थ करण्यासाठी भीमातीरी उभा राहिला आहे़ भाविक प्रथम त्या पुंडलिकाचे दर्शन घेतात़ त्यानंतर दर्शनरांगेतून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेताना दिसत आहेत़ कार्तिक वारी अजून पाच दिवस असताना दर्शन रांग सारडाभवनपर्यंत गेली आहे़ त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे़ मंदिर समितीच्या वतीने गोपाळपूरच्या पुढे विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत दर्शन रांगेची सोय केली आहे़ शिवाय २४ तास दर्शन सेवा उपलब्ध केल्याने भाविकांची सोय झाली आहे़
पोहोण्याचा अन् नावेतून भ्रमंतीचा आनंद़़
गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रभागा दुथडी भरून वाहिली नाही़ कार्तिक वारीदरम्यान उजनी धरणातून थोडेच पाणी सोडल्यामुळे केवळ डबक्यात स्नान करून किंवा हातपाय धुऊन भाविक पांडुरंगाच्या दर्शनाला जात होते़ यंदा मात्र चंद्रभागे भरपूर पाणी आहे़ त्यामुळे अनेक भाविक डुबकी मारून पोहोण्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत़ शिवाय काही भाविक नावेतून भ्रमंती करून आनंद लूटताना दिसूत आहेत़ चंद्रभागा पात्रात भरपूर पाणी असल्याने भाविक बुडण्याचा धोका होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे नगरपरिषदेच्या वतीने आपत्कालिन यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी भाविकांनी केली आहे़

Web Title: Kartik Vary, due to holidays, increased number of devotees in Pandit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.