कोयनेतून कर्नाटकला मिळणार आणखी १.७० टीएमसी पाणी
By Admin | Updated: April 17, 2017 18:44 IST2017-04-17T18:44:33+5:302017-04-17T18:44:33+5:30
.

कोयनेतून कर्नाटकला मिळणार आणखी १.७० टीएमसी पाणी
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर / विजयपूर दि १७ : सोलापूर: कर्नाटकातील विजयपूर आणि बागलकोट जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र पाणी टंचाईमुळे कोयना धरणातून आणखी १़७० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे़ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याने सीमावर्ती भागातील जनतेला दिलासा मिळाल्याचे कर्नाटकचे जलसंपदा मंत्री एम़बी़पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
आलमट्टी धरण क्षेत्रावर झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पाटील यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला़
महाराष्ट्राला पाणी सोडण्याची हमी देऊनही कर्नाटक सरकारने पूर्ण केली नाही़ गेल्यावर्षीही वारंवार विनंती करूनही कर्नाटकने महाराष्ट्राच्या सोलापूर-सांगली या जिल्ह्यांसाठी पाणी न सोडल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या या निर्णयाचे सीमावर्ती भागातून स्वागत होत आहे़
यापूर्वीच महाराष्ट्र सरकारने कोयना आणि वारणा जलाशयातून २.३६ टीएमसी पाणी सोडले आहे. या पाण्याचा विसर्ग अद्याप सुरू आहे. या पाण्याच्या बदल्यात कर्नाटकाने भीमा किंवा हिरेपडसलगी योजनेतून पाणी देण्याची अट मुख्यमंत्री फडणवीस यांनी घातली होती़ या अटीची पूर्तता कर्नाटक सरकारने केली नसल्याकडे लक्ष वेधले असता जलसंपदा मंत्री पाटील यांनी उत्तर देणे सोयीस्करपणे टाळले़
आता येणारे जादा १़७० टीएमसी पाणी आलमट्टी धरणात पोहोचेल. त्यावेळी गलगली येथील बॅरेजमधून ते पाणी कोल्हार बॅरेजला पुरविण्यात येईल. त्यामुळे विजापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील दुष्काळग्रस्त गावांसाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते खा. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकने शब्द न पाळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली़