घड्याळ, पंजाबरोबर कमळाची एकाकी झुंज

By Admin | Updated: February 17, 2017 20:14 IST2017-02-17T20:14:21+5:302017-02-17T20:14:21+5:30

प्रचार पोहोचला शिगेला : आरोपांच्या फैरीही जोरात

Kamal's solo battle with clock, paw | घड्याळ, पंजाबरोबर कमळाची एकाकी झुंज

घड्याळ, पंजाबरोबर कमळाची एकाकी झुंज

घड्याळ, पंजाबरोबर कमळाची एकाकी झुंज

विठ्ठल कवडे -पंढरपूर 

हातात घड्याळ बांधून कॉँग्रेस-राष्ट्रवादीने प्रचारात रंगत आणली असून पंढरपूर तालुक्यातील जि.प.च्या ७ व पंचायत समितीच्या १६ जागांवर घड्याळ, पंजाबरोबरच कमळाची एकाकी झुंज सुरू आहे. निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी ग्रामीण भागातील पारावर चर्चेची गुऱ्हाळे रंगू लागली आहेत.
ऊस दराच्या मुद्द्याने हैराण झालेल्या कॉँग्रेस-राष्ट्रवादीने स्थानिक प्रश्नांना बगल देत सरकारने शेतकऱ्यांवर दुष्काळात केलेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. मागील कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने दुष्काळात केलेली मदत, चारा छावण्या, पाण्याचे टॅँकर, मजूरांच्या हाताला काम दिले. शिवाय ७२ कोटी रूपये शेतकऱ्यांना कृषी कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिल्याचे आ. भारत भालके, कल्याणराव काळे, राजूबापू पाटील सांगत आहेत. जिल्हा बॅँकेतील घोटाळ्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज मिळेना झाले. सध्याचे सरकार सहकार मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आरोप केले जात आहेत.
आ. परिचारक गटाने सुरूवातीपासून श्री विठ्ठल, सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना व भीमा कारखान्याने शेतकऱ्यांना उसाचा दर जाहीर करून दिला नसल्याचा मुद्दा हायजॅक करून विरोधकांना चितपट करण्याचा प्रयत्न केला आहे. कॉँग्रेसच्या नेत्यांची घराणेशाही उघड झाली असून आ. भालकेंचे पूत्र भगिरथ भालके, कल्याणराव काळेंचे बंधू समाधान काळे, राजूबापू पाटील यांच्या पत्नी प्रफुल्लता पाटील, मोहन कोळेकर यांचे चिरंजीव महेश कोळेकर यांना उमेदवारी देऊन वर्षानुवर्षे सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचे आरोप परिचारक गटाकडून होत आहेत.
आ. प्रशांत परिचारक यांनी आपल्या गटात बंडखोरी होऊ दिली नाही. उलट विरोधकांत बंडखोरीचे प्रमाण जास्त झाल्याने याचा फायदा कोणाला होतो, हे मतमोजणीदिवशी कळेल.
कॉँग्रेस-राष्ट्रवादीची युती झाली. त्यात इतर मित्रपक्षांना सामावून घेत मोट बांधली. हातात घड्याळ आल्याने कार्यकर्त्यांमध्येही बळ आले. मात्र गटातटाच्या कार्यकर्त्यांची एकी करण्याकडे कोणी लक्ष दिले नसल्यानेच चणाक्ष कार्यकर्ते चर्चा करीत आहेत. आ. परिचारक यांनी पांडुरंग, युटोपियन, समाधान आवताडे यांनी दामाजी व आ. बबनराव शिंदे यांनी २५००, २५५० रूपयांपर्यंत दर देऊन शेतकऱ्यांना दुष्काळात सावरण्यासाठी सहकार्य केले. त्यामुळे शेतकरी पुढाऱ्यांपेक्षाही हुशार आहे. एक मूठ चाड्यावर असली तरी त्याचे लक्ष दिल्लीच्या तख्तापर्यंत असते. कोण कुठे, कोणासाठी काय करतो, याची जाणीव त्याला असल्याने निवडणुकीचा निकाल काय लागेल, हे मतदानादिवशी कळेल.

-----------------------
जिल्हा परिषद लक्षवेधी लढती
कासेगाव गट : भगिरत भालके-वसंतराव देशमुख, करकंब गट : रजनी देशमुख-रेखा पाटील, रोपळे गट : मोहन हळणवर-सुभाष माने.

-----------------
पंचायत समिती लक्षवेधी लढत
कासेगाव गण : प्रशांत देशमुख- सीताराम भुसे, गुरसाळे गण : राजेंद्र पाटील- महेश कोळेकर, पिराची कुरोली गण समाधान काळे-दिनकर नाईकनवरे, भाळवणी गण शिवाजी गवळी-संभाजी शिंदे, करकंब गण : नरसाप्पा देशमुख-राहूल पुरवत, टाकळी गण : प्रमोद देठे-मोहन देठे

Web Title: Kamal's solo battle with clock, paw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.