बाजार समितीच्या तापल्या तव्यावर भाजली जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:27 IST2021-08-20T04:27:37+5:302021-08-20T04:27:37+5:30
जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीची पोळी ------ सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकीय घडामोडीने सध्या वातावरण तापलेले आहे. ...

बाजार समितीच्या तापल्या तव्यावर भाजली जाणार
जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीची पोळी
------
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकीय घडामोडीने सध्या वातावरण तापलेले आहे. अशा परिस्थितीत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्याच्या संचालक निवडणुकीत त्याचे पडसाद उमटत आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांवर सुरेश हसापुरे यांचे वर्चस्व आहे. निवडक कार्यकर्त्यांच्या मदतीने अनेक संस्था स्वतःकडे ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. इतर नेत्यांचे सहकार क्षेत्राकडे फारसे लक्ष नाही. त्यांच्या तुलनेत सुरेश हसापुरे यांची सहकारी सोसायट्यांवर मजबूत पकड असल्याचे यापूर्वीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतून दिसून आले आहे. गतवेळी आप्पासाहेब पाटील-वडकबाळकर यांचे हसापुरे यांच्यासमोर कडवे आव्हान होते. हसापुरे यांना ५२, तर आप्पासाहेब पाटील यांना ३० मते मिळाली होती.
मागील निवडणुकीनंतर तालुक्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे. आप्पासाहेब पाटील यांनी जिल्हा बँकेच्या पराभवाचा वचपा बाजार समितीच्या निवडणुकीत काढला. बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार दिलीप माने यांची त्यांना साथ होती. ती साथ सोडून आप्पासाहेब पाटील यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या गोटात प्रवेश करीत हसापुरे यांच्यावर मात केली. आता पुन्हा त्यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. हसापुरे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच लॉबिंग सुरू केले आहे.
-------
विरोधातील उमेदवाराची चाचपणी
सुरेश हसापुरे यांची उमेदवारी निश्चित असून त्यांना यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने यांची रसद मिळणार आहे, तर त्यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार उतरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोसायट्यांच्या ठरावासाठी आप्पासाहेब पाटील-वडकबाळकर यांची धावपळ सुरू झाली आहे. विरोधक हसापुरे यांची दमछाक करू शकेल, अशा उमेदवाराच्या शोधात आहेत. त्यांची चाचपणी सुरू आहे.
-------
थकबाकीची डोकेदुखी
तालुक्यातील अनेक सहकारी सोसायट्या थकीत आहेत. कर्जमाफीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी भरणा केला नाही. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण अधिक आहे. अशा संस्थांना त्यातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान इच्छुकांसमोर आहे. मागील निवडणुकीत वडकबाळ सोसायटीला थकबाकीतून बाहेर काढण्यासाठी आप्पासाहेब पाटील यांनी तब्बल ५२ लाखांचा भरणा केला होता.
-----