शुगर लॉबीच्या प्रभावामुळे समीकरणे बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST2021-02-05T06:45:27+5:302021-02-05T06:45:27+5:30

सोलापूर : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चपळगाव गटामध्ये शुगर लॉबीचा चांगलाच प्रभाव दिसून आला. काही गावांतील समीकरणे बदलली तर ...

The influence of the sugar lobby changed the equations | शुगर लॉबीच्या प्रभावामुळे समीकरणे बदलली

शुगर लॉबीच्या प्रभावामुळे समीकरणे बदलली

सोलापूर : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चपळगाव गटामध्ये शुगर लॉबीचा चांगलाच प्रभाव दिसून आला. काही गावांतील समीकरणे बदलली तर या गटात भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना बाजूला ठेवून स्वतंत्र गट उभा करण्यात शुगर लॉबी यशस्वी ठरली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आर्थिक पाठबळामुळे सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांची सरमिसळ झाल्याने राजकीय नेते चक्रावून गेले आहेत.

आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सहभाग न घेता समर्थकांना बळ दिले. आर्थिक मदत देऊ शकत नाही, अशा स्पष्ट शब्दात सांगून नेत्यांनी कार्यकर्त्यांची प्रेमळ बोळवण केली; पण या परिसरातील कार्यकर्त्यांना आर्थिक रसद आणि बळ देऊन शुगर लॉबीने आपला करिष्मा दाखवला.

चुंगी, कुरनूर आणि मोट्याळ या तीन ग्रामपंचायतींमध्ये सत्तेत आलेल्या पॅनल प्रमुखांच्या एकत्रित छबीने अनेकांचे डोळे विस्फारले. काहींना छुपी मदत तर काहींना उघड आर्थिक रसद पुरवून कारखानदारांनी आपला प्रभाव सिद्ध केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

रसद पुरवलेल्या कारखान्याचे चालक थेट राजकारणात नाहीत. मात्र, त्यातील एका कारखानदाराने यापूर्वी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी चाचपणी केली होती. त्यात फारसे यश आले नव्हते. दुसऱ्या कारखानदाराने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नशीब आजमावले होते. आता या दोन्ही साखर कारखानदारांनी संयुक्तपणे चपळगाव गटात कार्यकर्त्यांना रसद पुरवून बांधणी सुरू केल्याची चर्चा आहे. त्याचा लाभ कोणाला होणार याविषयीची उत्सुकता आहे. पहिल्याच प्रयत्नात शुगर लॉबी यशस्वी ठरली असली तरी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तसेच त्यांच्या नेत्यांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे.

--------

संपर्काचा फटका नेमका कोणाला ?

दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री आणि आचेगाव येथे साखर कारखाने आहेत. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात त्यांचे बहुतांश कार्यक्षेत्र आहे. शुगर लॉबी थेट सक्रिय झाल्याने त्यांची राजकीय ताकद वाढत चालली आहे. या पुढच्या काळात त्यातील कोणाला राजकीय लाभ मिळणार आणि कोणाला फटका बसणार आज तरी स्पष्ट नाही. मात्र, तालुक्याच्या राजकीय वर्तुळात कारखानदारांच्या सक्रिय सहभागाची रंगतदार चर्चा आहे.

---------

इतिहासाची पुनरावृत्ती होणार का ?

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बलभीम शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी याच भागातून जिल्हा परिषद निवडणूक जिंकल्यानंतर विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली होती. त्यात त्यांना फारसे यश आले नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आचेगाव येथील जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी भाजपची उमेदवारी मिळण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यांच्या या मोहिमेची सूत्रे कुरनूर येथून हलवली जात होती. आताही जवळपास तीच स्थिती आहे. कुरनूर येथूनच दोन्ही साखर कारखानदारांनी आपला प्रभाव वाढवण्याचा पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू केला आहे.

-------

राजकीय पक्ष अन् नेतेही बेदखल

तालुक्याच्या उत्तर भागात नेहमीच राजकीय घडामोडी वेगाने घडत असतात. किंबहुना तालुक्याच्या राजकारणाला सुरुंग लावण्याचे काम याच भागातून करण्यात येते. आता शुगर लॉबीने चुंगी, कुरनूर आणि मोठ्याळ येथे आपला करिष्मा दाखवला आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेस अथवा भाजपाला फारसे यश आले नाही. आर्थिक पाठबळामुळे दोन्ही पक्षांना बेदखल करीत कार्यकर्त्यांनी स्वतंत्र फळी उभारली सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांची सरमिसळ झाल्याने राजकीय नेते चक्रावून गेले आहेत.

Web Title: The influence of the sugar lobby changed the equations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.